ती आगीनं होरपळली, विव्हळत पडली, डॉक्टर आलेच नाहीत; नंतर…बीडमधील संतापजनक घटना!
बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एक महिला आगीत होरपळल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले नाहीत. तसा आरोप केला जात आहे.

Beed News : राज्यात शासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता, रुग्णांची होत असलेली हेळसांड, उपकरणांचा अभाव, तंत्रज्ञानाचा अभाव यासारख्या त्रुटींमुळे राज्यातल्या अनेक रुग्णालयांत रुग्णांची प्रचंड हेळसांड होते. यातून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. असे असतानाच आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला आगीमध्ये होरपळलेली असूनही तिच्यावर उपचार करण्यासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आलेच नाहीत. परिणामी तिची प्रकृती आता गंभीर झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड शहरातील विवाहित महिला घरात अचानक लागलेल्या आगीमध्ये होरपळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर या महिलेला जळालेल्या अवस्थेतच जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बीड शहरातील शिंदे नगर भागात ही घटना घडली. होरपळलेल्या महिलेचे नाव स्वाती कानडे असून ही महिला 26 वर्षांची आहे. आज (18 जून) दुपारी राहत्या घरात अचानक लागलेल्या आगीमध्ये ही महिला 55 ते 60 टक्के जळाली आहे. तत्काळ रुग्णालयात दाखल करूनही ती तिथे जवळपास दीड तास विव्हळत पडली होती.
डॉक्टरांनी या महिलेवर उपचार केले नाहीत
या महिलेला दुपारी दीड वाजता दाखल करण्यात आलं होतं. मात्र तीन वाजेपर्यंत म्हणजेच दीड तास कोणत्याही डॉक्टरांनी या महिलेवर उपचार केले नाहीत. कोणतेही डॉक्टर तपासण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले नाहीत असा महिलेच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने या महिलेला शेवटी बीड शहरातील गीताई या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
डॉक्टरांवर कारवाई करावी
सध्या या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान दोषी कर्मचारी आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
रुग्णालयाने काय स्पष्टीकरण दिले?
तर दुसरीकडे आमचे डॉक्टर पोहोचले होते मात्र तोपर्यंत पेशंट त्या ठिकाणाहून हलवण्यात आले होते. त्यांनी रुग्णाला सुरुवातीला अपघात विभागात आणणं गरजेचं होतं. मात्र त्यांनी तसं न करता रुग्णाला जळीत कक्षात नेले. यामुळे डॉक्टरांना तिथे पोहोचायला वेळ लागला, असे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. तसेच या संदर्भात आम्ही चौकशी करू. कोणी दोषी आढळले तर कारवाई करु, असं बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत टीव्ही 9 मराठीला सांगितलं आहे.
