तुमचा जीव धोक्यात, हायवेवरील 10 हॉटस्पॉट जाहीर; महामार्गावर प्रवास करताना कशी घ्याल काळजी?
बीड-तुळजापूर NH 52 महामार्गावर धावत्या वाहनांना लक्ष्य करून होणाऱ्या जबरी चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीड व धाराशिव पोलिसांनी 'बीड ब्रेक' मोहीम हाती घेतली असून, १० धोकादायक हॉटस्पॉट्स जाहीर केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 (NH 52) वर बीड ते तुळजापूर दरम्यान धावत्या वाहनांना लक्ष्य करून होणारे जबरी चोरी, लुटमार आणि दरोड्याचे सत्र सुरु आहे. हे रोखण्यासाठी आता बीड आणि धाराशिव पोलिसांसह महामार्ग सुरक्षा पथकाने कठोर पावलं उचलली आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला असून, मांजरसुंबा घाटासह १० ठिकाणे धोकादायक हॉटस्पॉट्स म्हणून जाहीर केली आहेत.
सातत्याने वाढत्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत बीड आणि धाराशिव पोलिसांनी एकत्रित बीड ब्रेक मोहीम हाती घेतली आहे. यावेळी महामार्गावरील १० सर्वाधिक धोकादायक हॉटस्पॉट्स जाहीर करण्यात आले आहेत. तसेच याद्वारे प्रवाशांना अत्यावश्यक सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
टार्गेटवर कोण?
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषतः रात्रीच्या वेळी गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या महामार्गावरील निर्मनुष्य आणि डोंगराळ भागाचा फायदा घेत, चोरट्यांच्या टोळ्या विशिष्ट पद्धतीने प्रवाशांना लक्ष्य करत आहेत. यावेळी प्रामुख्याने लांब पल्ल्याचे मालवाहतूक करणारे ट्रक चालक, रात्री एकट्याने प्रवास करणारे चारचाकी वाहन चालक आणि दुचाकीस्वार यांना लक्ष्य केले जात आहे.
तसेच कृत्रिम अपघात घडवून मदत करण्याच्या बहाण्याने किंवा रस्त्यात अडथळे जॅक/खिळे असलेले लाकडी ओंडके, ठिबक पाईप बंडल निर्माण करून वाहन थांबवून शस्त्रांचा धाक दाखवून सामुदायिक हल्ले करण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बीडच्या मांजसूबा घाट आणि धाराशिव येडशी बायपास हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या ठिकाणी गुन्हेगारांचे दुभाजकातील झाडीत लपून बसण्याचे आणि वाहनांना थांबवण्याचे प्रकार वाढले आहेत.
आळा घालण्यासाठी रणनिती काय?
यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाने या घटनांना आळा घालण्यासाठी काही रणनिती आखली आहे. महामार्ग सुरक्षा पथकासह स्थानिक पोलिसांची एकूण ७ गस्ती वाहने या पट्ट्यात रात्रंदिवस गस्त घालणार आहेत. तसेच हॉटेल चालक, धाबे मालक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांना संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती पोलिसांना देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, महामार्गालगतच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दलाला तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी ॲक्टिव्ह करण्यात आले आहे. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठीचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत. तसेच निर्मनुष्य ठिकाणे आणि घाटांच्या भागांचे निरीक्षण करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे, जेणेकरून चोरट्यांचे अड्डे शोधणे आणि हालचाली टिपणे शक्य होईल.
| क्र. | धोकादायक ठिकाण (Hotspot) | जिल्हा |
| १ | मांजरसुंबा घाट | बीड |
| २ | चौसाळा बायपास | बीड |
| ३ | पारगाव बायपास | बीड |
| ४ | सरमकुंडी फाटा | बीड/धाराशिव सीमा |
| ५ | इंदापूर फाटा | धाराशिव |
| ६ | पार्डी फाटा | धाराशिव |
| ७ | घुले माळ जवळील उड्डाणपूल | धाराशिव |
| ८ | तेरखेडा ते येडशी टोल नाका | धाराशिव |
| ९ | येडशी बायपास | धाराशिव |
| १० | धाराशिव ते तुळजापूर | धाराशिव |
प्रवाशांसाठी अत्यावश्यक सूचना
- नैसर्गिक गरजेसाठी किंवा वाहनात बिघाड झाल्यास केवळ लोकांची वर्दळ असलेल्या, प्रकाशमान ठिकाणीच थांबावे.
- जर आपल्याला रस्त्यावर संशयास्पद वस्तू (दगड, लाकूड) किंवा अनोळखी व्यक्ती मदतीच्या नावाखाली थांबवत असतील, तर गाडी न थांबवता वेगात पुढे जावे आणि त्वरित ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- महामार्गाच्या दुभाजकाला खेटून वाहन चालवणे टाळावे.
- प्रवाशांच्या सहकार्याने आणि पोलिसांच्या वाढीव प्रयत्नांमुळे या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
