ऐका गुट्टेवाडीची कहाणी, दाढी, कटिंग, गिरणीतलं दळणही फ्री! रुग्णालयात जाण्यासाठी येते सरपंचाची गाडी…

सध्या अशोक क्षीरसागर हे गावचे सरपंच आहेत. मात्र गावात कुणामध्येच मतभेद नाहीत. बालासाहेब गुट्टे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. गुट्टे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

ऐका गुट्टेवाडीची कहाणी, दाढी, कटिंग, गिरणीतलं दळणही फ्री! रुग्णालयात जाण्यासाठी येते सरपंचाची गाडी...
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 12:59 PM

बीडः जिल्ह्यातील (Beed District) परळी तालुक्यातील गुट्टेवाडी (Guttewadi) हे दोन हजार लोकसंख्या असलेलं गाव. गाव तसा लहान, पण इथल्या सरपंच आणि उपसरपंचांनी मिळून गावातल्या लोकांना, प्रजेला जणू सुखी, आनंदी ठेवण्याचं व्रत घेतलं आहे. मागील दहा वर्षांपासून गावातल्या लोकांना दाढी, कटींग फ्री मध्ये करून दिली जाते. तसेच गावातल्या प्रत्येक घरात लागणारं कोणतंही दळण गिरणीत नेल्यावर त्याचे पैसे आकारले जात नाहीत. गावात सध्या उपसरपंच असलेले बालासाहेब गुट्टे (Balasaheb Gutte) हे स्वखर्चातून यासाठी निधी पुरवतात. गावकऱ्यांची सेवा करण्याचं आणि त्यांना आनंदी ठेवण्याचं व्रतच जणू त्यांनी घेतलंय.

गावकऱ्यांच्या सेवेतून समाज सेवा!

परळी तालुक्यातील गुट्टेवाडी या गावात ग्रामपंचायतीकडून गावातील प्रत्येकाला दाढी-कटिंगची मोफत सुविधा दिली जाते. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला जे दळण लागतं. त्या पिठाच्या गिरणीतून कोणत्याही गावकऱ्याकडून पैसे आकारले जात नाहीत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतकडून कुठलीही कर आकारणी केली जात नाही. या सर्व बाबींचा खर्च उपसरपंच बालासाहेब गुट्टे हे स्वतःच्या खिशातून करतात.एवढंच काय तर गावातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी किंवा रुग्णालयात जाण्याची अडचण असेल तर खुद्द सरपंचांची गाडी येते. रात्री- अपरात्री गावकऱ्यांना कधीही गरज लागली तरी सरपंच स्वतः त्यांची गाडी घेऊन नागरिकांच्या मदतीसाठी हजर होतात. त्यामुळे गावकरी येथील सरपंच आणि उपसरपंचांवर खूष आहेत. असे सरपंच इतरही गावांना मिळावेत, असं ते म्हणतात.

उपसरपंच बालासाहेब गुट्टेंचे समाजकार्य

परळी तालुक्यातील गुट्टेवाडी हे 2 हजार एवढी लोकसंख्या असलेलं गाव. गावात जवळपास 750 एवढे मतदार आहेत. मागील 10 वर्षांपासून येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते आहे. उपसरपंच बालासाहेब गुट्टे हे पाच वर्षांपूर्वी सरपंच होते. आता ते उपसरपंच आहेत. सध्या अशोक क्षीरसागर हे गावचे सरपंच आहेत. मात्र गावात कुणामध्येच मतभेद नाहीत. बालासाहेब गुट्टे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. गुट्टे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

इतर बातम्या-

VIDEO : Nawab Malik यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर राज्यपालांशी चर्चा करणार – Kirit Somaiya

बप्पी लहरींच्या ‘त्या’ अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? मुलाने नाकारलं आजारपणाचं कारण

Follow Us