
Chhagan Bhujbal-Vijay Vadettiwar- Babanrao Taywade : 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भातील शासन परिपत्रक काढण्यात आले. त्याविरोधात आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. सायंकाळी 4 वाजता मोर्चा आणि सभा होईल. यामध्ये छगन भुजबळ यांची तोफ धडाडणार आहे. त्यांनी या मोर्चापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. तर या मोर्चापूर्वी ओबीसी नेत्यांनी भुजबळांना मोठा धक्का दिला आहे. काय आहे अपडेट?
बबनराव तायवाडे यांचा दुरूनच रामराम
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आज बीड येथील ओबीसी मोर्चाला जाणार नाहीत. बीडच्या मोर्चातून ओबीसी समाज दिशाभुल होणार नाही, याची काळजी नेत्यांनी घ्यावी, असा टोला तायवाडे यांनी लगावला. २ तारखेच्या ‘जीआर’मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, त्यामुळे आजच्या मोर्चाच्या मागणीला मी सहमत नाही, मला निमंत्रण पण नाही. आमच्या ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहे, मनभेद नाही. भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
तायवाडे, वडेट्टीवार, भुजबळ आणि लक्ष्मण हाके हे सर्व ओबीसी नेते भविष्यात एका मंचावर दिसणार असे वक्तव्य पण डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले. आजच्या बीड येथील मोर्चात ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घ्यावी. नोंद नसलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून शकत नाही. याचिका कुठल्या आधारावर आहे, त्यावरुन सर्वोच्च न्यायालय निर्णय देतील. २ तारखेच्या जीआरमध्ये जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत सांगितली आहे. डायरेक्ट मराठा समाजाला आरक्षण द्या, असं म्हटलं नाही. २ सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांना काय मिळालं? याचं मुल्यांकन त्यांनी करावं. आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, असा दावा पुन्हा एकदा डॉ. तायवाडे यांनी केला.
विजय वडेट्टावार यांनी फिरवली पाठ
तर दुसरीकडे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार आज बीड येथील ओबीसी सभेला जाणार नाहीत असे स्पष्ट झाले आहे. छगन भुजबळ नागपूर ओबीसी मोर्चाला आले नव्हते, आज वडेट्टीवार बीड येथील मोर्चाला जाणार नाहीत. विजय वडेट्टीवार यांचा आज त्यांच्या मतदारसंघात दौरा आहेत. भुजबळ आणि वडेट्टीवार हे दोन्ही ओबीसी नेते एका मंचावर का येत नाहीत, असा सवाल आता विचारल्या जात आहे.