वाल्मिक कराडचा अजून एक कुटाणा, मांजरसुंब्याला 9 एकरवर आलिशान रिसॉर्टचा प्लॅन, शेतकऱ्यांना असा दिला त्रास
Walmik Karad Land Manjarsumbha : आवादा कंपनी खंडणी आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा अजून एक प्रताप समोर आला आहे. त्याची बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे, याठिकाणी त्याला आलिशान रिसॉर्ट उभारायचा होता.

आवादा कंपनी खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याचा अजून एक प्रताप समोर आला आहे. त्याची बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे, याठिकाणी त्याला आलिशान रिसॉर्ट उभारायचा होता. ही जमीन त्याची पत्नी ज्योती जाधव हिच्या नावाने असल्याचे समोर आले आहे. तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आता वादाला तोंड फुटले आहे.
कराड थोड्याचवेळात न्यायालयात
खंडणी आणि हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्यावेळी त्याच्या कोठडीविषयीची सुनावणी झाली नाही. आज न्यायालयासमोर ही सुनावणी होत आहे. कराड याला थोड्याचवेळात न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 29 नोव्हेंबर 2024 रोजीचे केज येथील माणिक चाटे याच्या संपर्क कार्यालयातील सीसीटीव्ही पुरावा समोर आला आहे. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकीचा फोन याच कार्यालयातून करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या सीसीटीव्हीत सुदर्शन घुले, माणिक चाटे, कृष्णा आंधळे, वाल्मिक कराड आणि इतर आरोपी एकत्र दिसत आहेत.




मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन
तपासा दरम्यान वाल्मिक कराड याची पत्नी ज्योती जाधव हिच्या नावे बीड जवळील मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. तर त्याने या परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या जमिनीवर त्याला आलिशान रिसॉर्ट सुरू करायचा असल्याचे समोर येत आहे. इतकेच नाही तर जवळपासच्या शेतकर्यांच्या जमिनीतील मुरूम उपसा करून त्याने तो स्वत:च्या मालकीच्या शेतात टाकल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारीला प्रशासनाच्या वाटण्याच्या अक्षता
शेतकर्यांनी वाल्मिक कराड याने जमिनी खरडल्याची तक्रार जुलै 2024 मध्ये केली होती. पण प्रशासनाने या तक्रारीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. मुरूम चोरल्याची तक्रार करूनही प्रशासनाने या बाहुबलीसमोर लोटांगण घेतले. या तक्रारीची साधी दखल सुद्धा घेतली नाही, असा आरोप शेतकर्यांनी केली आहे.