याचा अर्थ तुम्ही अनेक बायकांना… भरत गोगावले यांची अजितदादा गटाच्या आमदारावर सडकून टीका

कॅबिनेट बैठकीचा अजेंडा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून टीकाटिप्पणी होत आहे. यावर राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अजेंडा फोडायचा नसतो. संध्याकाळी नोट येत असते. ती मंत्र्याने राखायची असते. त्यांच्या पीएस आणि पीएनी ती उघड करायची नसते. पण चौकशीत जे आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं गोगावले म्हणाले.

याचा अर्थ तुम्ही अनेक बायकांना... भरत गोगावले यांची अजितदादा गटाच्या आमदारावर सडकून टीका
भरत गोगावले
Image Credit source: social media
| Updated on: Feb 20, 2025 | 10:56 AM

अजितदादा गटाचे आमदार राजन पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगल्याचा अभिमान आहे, असं राजन पाटील म्हणाले होते. या विधानावर आता महायुतीतूनच आक्षेप घेतला जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतानाच राजन पाटील यांना चांगलंच सुनावलं आहे. राजन पाटील यांनी हे बोलायची गरज नव्हती, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

मंत्री भरत गोगावले काल सोलापुरात होते. यावेळी त्यांनी राजन पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. राजन पाटलांबाबत मी वस्तुस्थिती बोललो आहे. वस्तुस्थिती सांगायला काही हरकत नाही. जबाबदार माणसाने काय बोलायला पाहिजे, चालायला पाहिजे हे कळत नसेल तर आता लोकं वेडी राहिलेले नाहीत. शिवाजी महाराजांनी पाटलांचा चौरंग केलाच ना. लग्नाच्या आधी मुलांच्या गोष्टींची वाहवा करणं हे चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्ही कित्येक महिलांना खराब केलं असेल. हे यावरून कळतं, अशी टीकाच भरत गोगावले यांनी केली आहे.

जरांगेंना सल्ला

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यावर बोलताना गोगावले यांनी जरांगे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. जरांगे यांना सूचना वजा विनंती आहे की सर्वच गोष्टी एका वेळेला मागणं योग्य नाही. शासनालाही देताना त्या भविष्यात काळात टिकतील हे पाहायचं असतं. आम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं ते टिकवत आहोत. कुणबी नोंदी करून सर्टिफिकेट देत आहोत. काही गोष्टीत सरकारला अडचण होईल असं त्यांनी चालू नये, असा सल्ला गोगावले यांनी दिला आहे.

आमचा दरवाजा मोठा

उद्धव ठाकरे यांनी आता आमदार आणि खासदारांच्या दर आठवड्याला बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी वेळ होती, तेव्हा त्यांना करता आलं नाही. आता हातून गेल्यावर सर्वच परत येईल सांगता येत नाही. कारण एवढी मॅजोरीटी आमच्याकडे आली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे लोक आमच्यासोबत येतील. जे येतील ते येतील. जे येणार नाहीत ते नाही येणार. आम्ही कुणावरही जबरदस्ती करणार नाही. आपल्या गावाचा भागाचा विकास व्हावा असं वाटत असेल तर महायुतीचं सहकार्य घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आमच्याकडे कुणी येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. कारण आमचा दरवाजा थोडा मोठा आहे. आम्ही त्यांना प्रवेश देऊ शकतो, असं ते म्हणाले.

त्यांचा जय महाराष्ट्र ठरला होता

कोकणातून ठाकरे गट मागेच साफ झाला असता. तिथे फक्त भास्कर जाधव उरले. ते थोड्या फरकाने आले. ते जेवढे त्वेषाने बोलत होते. तेवढ्या फरकाने आले नाही. दोन हजार मताधिक्य घेतले. थोड्या फरकाने आले. नाही तर त्यांचा जय महाराष्ट्र ठरला होता. ते तरले. आता ते विचार करत आहेत काय करायचं ते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि पालघरमध्ये त्यांचे आहेत कोण? एकेकाळी हे जिल्हे त्यांचे बालेकिल्ले होते. ते आम्ही आता एकनाथ शिंदेंचे बालेकिल्ले केले. त्यामुळे उरलेले लोकही आमच्यासोबत येतील, असा दावा त्यांनी केला.