मोठी दुर्घटना! भांडूपमध्ये अख्खा रस्ताच खचला, तुफान पावसामुळे…पोलीस घटनास्थळी दाखल!

सध्या या ठिकाणी अग्निशामक दल, मुंबई पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचले आहेत. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोणत्याही नागरिकाला या रस्त्यावरून जाऊ देण्यास संमती दिली जात नाहीये.

मोठी दुर्घटना! भांडूपमध्ये अख्खा रस्ताच खचला, तुफान पावसामुळे...पोलीस घटनास्थळी दाखल!
bhandup road wash away
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 04, 2026 | 3:18 PM

Mumbai Rain : मुंबई, उपगरात सध्या तुफान पाऊस सुरू आहे. पुढचे काही तास हा पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, मुंबईत पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. माटुंगा, दादर यासारख्या भागात झाड उन्मळून पडले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. असे असतानाच आता भांडूप परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. भांडूपमध्ये भलामोठा रस्ता खचला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईत सुरू असलेल्या सध्याच्या मुसळधार पावसामुळे भांडूपमधील सोनपूर येथील एलबीएस परिसरातील रस्ता खचला आहे. या रस्त्याच्या बाजूलाच खोदकाम सुरू असल्याने ही दुर्घटना घडली आहे. रस्ता खचनाताची प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या दुर्घटनेत रस्त्याजवळ एक झाड होते. तेही उन्मळून पडले आहे. मुसळधार पावसामुळे तेथे भयावह स्थिती झाली आहे. रस्त्यासह फुटपाथही पाण्यात वाहून आहे.

इमारत खोदताना रस्त्याला बसले धक्के

या रस्त्याच्या बाजूलाच अमारत उभारण्याचे काम सुरू होते. खोदकामामुळे रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा झाला होता. इमारत खोदताना या रस्त्याला अगोदरच धक्के बसले होते. गेल्या काही दिवसांपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील जमीन ओली झाली होती परिणामी आता रस्ता खचून गेला आहे.

रस्ता केला बंद

सध्या या ठिकाणी अग्निशामक दल, मुंबई पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचले आहेत. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोणत्याही नागरिकाला या रस्त्यावरून जाऊ देण्यास संमती दिली जात नाहीये. या दुर्घटनेत एका वाहनाची नासधूस झाली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अशा प्रकारच्या घटना लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. तसेच गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us