
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या निवडणुकींनंतर महानगर पालिकांच्या निवडणुकींची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीची योजना आखताना दिसत आहे. निवडणुकीच्या या धावपळीत अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. प्रमुख महिला नेत्याने राजीनामा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या गेल्या काही काळापासून पक्षात नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता यांनी NCP शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचा राजीनामा पक्षाकडून अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. यावर अजित पवार पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पोलिसांची बाजू घेतली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांनी पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली होती. या सर्व घडामोडीनंतर रुपाली ठोंबरे पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे.
रुपाली ठोंबरे पाटील या आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कारण रुपाली पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुंबईत भेट घेतली होती. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या संगीता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे त्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेनेत जाण्याविषयी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले होते की, श्रीकांत शिंदे यांची खासदार निधीच्या कामासंदर्भात भेट घेतली होती. शिंदेंनी माझ्यासारख्या चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला जर विचारलं तर ती मी त्याच्यावरती विचार करेल. कुणामुळे तरी माझं प्रवक्ते पद गेलं, तरीही मी काम करणे थांबवले नाही. शिवसेना शिंदे पक्षाकडून चांगली ऑफर असेल तर मी विचार करेल.