अजितदादा गटाच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, घेतला मोठा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसला आहे, नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराला देखील वेग आल्याचं दिसून येत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी इच्छूक असलेले अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत, त्यामुळे ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधताना पक्षश्रेष्ठी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नाशिकमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष नामदेवराव लोंढे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे, कारण नामदेवराव लोंढे हे माणिकराव कोकाटे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू समजले जातात.
दरम्यान नामदेवराव लोंढे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना मोठी लॉटरी लागली आहे. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करत एबी फॉर्म देण्यात आला आहे. दरम्यान भगूरनंतर सिन्नरमध्येही शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. नामदेवराव लोंढे यांनी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला, त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत तातडीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
माजी उपनगराध्यक्ष नामदेवराव लोंढे यांच्यासह सिन्नर नगर परिषदेच्या आणखी तीन माजी नगरसेवकांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच नामदेवराव लोंढे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सिन्नरमध्ये चौरंगी लढत होणार आहे, महायुतीचे तीनही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत, तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे, अशी या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.
