
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, जोरदार पक्षांतर देखील सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, पक्षांना लागलेली ही गळती महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याचं पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा रहिमतपूर येथे होणार असून, त्यासाठी अजित पवार शहरात दाखल झाले आहेत, या पक्षप्रवेशापूर्वी शहरातून अजित पवार यांची ओपन जीप रॅली देखील काढण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं बळ वाढणार आहे.
दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओबीसीसाठी राखीव असलेल्या जागांवर जे मुळचे ओबीसी आहेत, अशाच इच्छुकांना प्रधान्य द्या, जिथे ओबीसी उमेदवार उपलब्धच नसेल तर तिथे मग ज्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं आहे, अशा कुणबी इच्छूक उमेदवारांना उमेदवारी द्या, अशा सूचना या बैठकीमध्ये शरद पवार यांनी उपस्थित खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच भाजपासोबत युती नकोच असा सूर देखील या बैठकीमध्ये पुन्हा एकदा उमटला आहे.