
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी करण्यासंदर्भात सर्व पक्षांकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. मुंबई आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती होऊ शकते. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे भाजप आणि शिवेसना शिंदे गटाची राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती होणार नाही, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याच्या तयारीत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना महायुतीमधील अनेक जण नाराज असल्याची बातमी समोर येत आहे, याचा सर्वात मोठा फटका हा आता शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.
पुण्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे. एकाचवेळी शिवसेना शिंदे गटाच्या अडीचशे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेंकर यांच्याकडून या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या शहर अध्यक्षांनी आणि नेत्यांनी आमची फसवणूक केली, आम्हाला फक्त आठ ते दहा जागा मिळणार असल्याचं समजत आहे. आमच्या नेत्यांवर भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पक्षांतराला वेग
दरम्यान दुसरीकडे राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची घोषणा झाली होती, तेव्हा अनेक इच्छुकांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. भाजपात सर्वात जास्त इनकमिंग झालं होतं. त्याचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला, यावरून शिवसेना शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली होती. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांचे कार्यकर्ते आणि नेते घेणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच जाहीर करून टाकलं आहे. परंतु तरी देखील शिवसेना शिंदे गट वगळता इतर पक्षामधून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे.