मोठी बातमी! भाजपानं डाव टाकलाच, महापालिकेपूर्वी उद्धव ठाकरेंना बसणार मोठा हादरा? उद्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! भाजपानं डाव टाकलाच, महापालिकेपूर्वी उद्धव ठाकरेंना बसणार मोठा हादरा? उद्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार
| Updated on: Jul 13, 2025 | 9:02 PM

किशोर पाटील, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हे यश टिकून ठेवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीची बहुमतानं सत्ता आली. 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती हे महाविकास आघाडीतील घटक पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून, जळगाव महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे दोन माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात 13 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे, सोबतच अनेक कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भाजपच्या वाटेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने फोनवरून बोलताना प्रवेशाबाबत माहिती दिली असून, मुहूर्त उद्या निश्चित होणार असल्याचे सांगितले आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लड्डा यांच्या उपस्थितीत उद्या बैठक पार पडणार असून प्रवेशाची तारीख आणि ठिकाण निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यात आहे. त्यापूर्वी जर हा पक्ष प्रवेश झाला तर हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे, तर दुसरीकडे जळगावात भाजपची ताकद वाढणार आहे, ज्याचा फयदा त्यांना महापालिका निवडणुकीसाठी होऊ शकतो.