
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी व शेतकरी नेत्यांनी याबाबत वारंवार मागणी केली आहे. अशातच आता शेतकरी कर्जमाफीबाबत मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोठ विधान केल आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून कर्जमाफी होणार असल्याचे समोर आले आहे. मंत्री संजय राठोड यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठं विधान केलं आहे.
मंत्री संजय राठोड यांनी कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, हा पुरस्कार नसून नव्या पिढीला दिलेला ठेवा आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख आहे. राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल.
याआधी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं. मी शेतकरी पुत्र आहे. माझा जन्म शेतकऱ्याच्या घरात झाला आहे. सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील असं भरणे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता आगामी काळात कर्जमाफीचे संकेत मिळाले आहेत. कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीककर्ज काढून पिकांची लागवड केली होती, मात्र दुष्काळामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, त्यामुळेच वारंवार कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे.