तुझी खाकी वर्दी उतरवून टाकीन, भाजप उमेदवाराची दादागिरी, थेट पोलिसाला मारहाण करतानाचा Video समोर
नागपूरच्या दिगडोह येथे भाजप नगरसेवक उमेदवार अनिल शर्मा यांनी पोलिस शिपाई वृषभ भातुलकर यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डीजेच्या आवाजावरून झालेल्या वादातून शर्मा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिपायाला लाथाबुक्क्यांनी मारले.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यांतर्गत डिगडोह नगरपरिषद परिसरात भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल शर्मा यांनी एका पोलिस शिपायाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या १० ते १२ कार्यकर्त्यांनी पोलिस शिपायाला केलेल्या मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे डिगडोह परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांच्या कारवाईवर राजकीय दबाव असल्याचा आरोप होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई वृषभ भातुलकर हे हिंगणा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. ड्युटीवरून घरी परतल्यानंतर त्यांना त्यांच्या सोसायटीत भाजप कार्यकर्त्यांच्या घरी मोठ्या आवाजात डिजे सुरू असल्याचे आढळले. यापूर्वी, शिपाई भातुलकर यांच्या मुलीच्या वाढदिवसावेळी सोसायटीचे सचिव अभयकुमार दास यांना त्यांना आवाज बंद करण्यासाठी दबाव आणला होता. मात्र भाजप कार्यकर्त्याच्या घरी डिजेचा आवाज सुरु असल्याने त्यांनी सोसायटीचे सचिव अभयकुमार दास यांना विचारणा केली होती. मात्र सचिव दास यांनी उलट भातुलकर यांच्यावरच दादागिरी केली.
सचिव अभय दास यांनी भाजप उमेदवार अनिल शर्मा यांना खाली बोलावले. भातुलकर खाली येताच अनिल शर्मा यांनी त्यांना कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अभयकुमार दास, शरद शर्मा, साजन शर्मा, अजय पाठक यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्ते उपस्थित होते. वृषभ भातुलकर यांना घेरून ही सामूहिक मारहाण करण्यात आली.
मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
या मारहाणीदरम्यान आरोपींनी शिपाई भातुलकर यांना “तुझी खाकी वर्दी उतरवून टाकीन”, “सस्पेंड करून टाकीन” आणि “जीव मारून टाकीन” अशा गंभीर धमक्या दिल्याचा आरोप भातुलकर यांनी केला आहे. शिपायाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिक संतापले आहेत.
या गंभीर घटनेनंतर हिंगणा पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी, दोन्हीकडील तक्रारी घेऊन केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओमध्ये शिपायावर झालेला हल्ला स्पष्टपणे दिसत असतानाही, पोलिसांनी आरोपींवर अटकेची किंवा कठोर कलमांची कारवाई न केल्याने, त्यांच्यावर राजकीय दबावाखाली काम करत असल्याची टीका होत आहे.
दरम्यान कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या शिपायालाच अशा प्रकारे मारहाण होणे, ही गंभीर बाब असून आहे. याप्रकरणी नागपूर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

