
Thane Municipal Corporation Election : राज्यात एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला आहे. हा निकाल लागून आता तीन दिवस उलटले असले तरीही राजकीय घडामोडी थांबलेल्या नाहीत. निवडणुकीतील विजयानंतर आता महायुतीमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच चालू झाली आहे. ज्या महापालिकेत एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक जास्त आहेत, तिथे आमचाच महापौर झाल पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मुंबई महापालिकेत मात्र शिंदे यांची शिवसेना अडीच वर्षांसाठी महापौरपद मागत असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता भाजपाने एकनाथ शिंदे यांची चांगलीच कोंडी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांची मुंबईतील भूमिका पाहता भाजपाने ठाण्यामध्ये थेट महापौरपदावर दावा सांगितला आहे. आता या नव्या मागणीमुळे शिंदे अडकीत्त्यात सापडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीला ठाण्यात मोठे यश मिळाले आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाचे ठाण्यात 71 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपाला फक्त 28 जागांवर जिंकता आलेले आहे. असे असूनही महायुतीचा धर्म असे म्हणत भाजपा ठाण्यात अडीच वर्षांसाठी महापौरपद मागत आहे. ठाण्यात एकूण 131 जागांसाठी निवडणूक झाली होती. शिंदे यांच्या विजयी उमेदवारांचा आकडा पाहता ते ठाण्यात आपला महापौर सहज बसवू शकतात. असे असले तरी शिंदे यांची मुंबईत कोंडी व्हावी यासाठी भाजपाने हा डाव टाकल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे हे मुंबईत अडीच वर्षांसाठी महापौरपद मागत असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता महायुती असल्यामुळे भाजपा ठाण्यातही सत्तेत भागिदारी मागत आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे नेमकं काय करणार? मुंबईत सत्तेत वाटा हवा असेल तर बहुमत असूनही ते ठाण्यात भाजपाला सत्तेत सहभागी करून घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दावोसहून परत येणार आहेत. त्यानंतर घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.