मुस्लिम समाजाला आता कळून चुकलय की, उद्धव ठाकरे हे…भाजप जिल्हाध्यक्षाचे जिव्हारी लागणारे शब्द

"युतीमध्ये किती जागा शिंदे गटाला द्याव्या, किती जागा भाजपने लढवाव्यात हे मी सांगणं उचित नाही. आज त्यावर निर्णय होईल. मात्र पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेश वरपूडकर वॉर्ड निहाय अभ्यास करत आहेत"

मुस्लिम समाजाला आता कळून चुकलय की, उद्धव ठाकरे हे...भाजप जिल्हाध्यक्षाचे जिव्हारी लागणारे शब्द
uddhav Thackeray
| Updated on: Dec 26, 2025 | 1:39 PM

खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान म्हणजे भाजपला मतदान असं वक्तव्य केलं होतं. त्यावर सुरज भुमरे यांनी उत्तर दिलं आहे. “खासदार संजय जाधव यांनी आजवर खान पाहिजे की बाण पाहिजे यावर राजकारण केले. मात्र जनता सुज्ञ झाली आहे. जनता आता भाजपच्या मागे आहे, झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने भरभरून भाजपला मतदान केले, विकास कोण करू शकते हे जनतेला आता माहीत झाले आहे” असं भाजप जिल्हाध्यक्ष सुरज भुमरे म्हणाले. “लोकसभेला आणि विधानसभेला त्यांना मुस्लिम मतदान झालं म्हणून त्यांचं साधून गेलं. मात्र नगरपालिकेला त्यांना मतदान मिळालं नाही. कारण मुस्लिम समाजाला हे आता कळून चुकलं, त्यांचे नेते उद्धव ठाकरे पाच वर्षे घराबाहेर निघत नाही, त्यामुळे जनतेला त्यांच्यावरचा विश्वास उडून गेला आणि त्यामुळेच नगरपालिकेत परभणी जिल्हा काँग्रेस आणि उद्धव सेना मुक्त झाला” असं भाजप जिल्हाध्यक्ष सुरज भुमरे म्हणाले.

“युतीमध्ये किती जागा शिंदे गटाला द्याव्या, किती जागा भाजपने लढवाव्यात हे मी सांगणं उचित नाही. आज त्यावर निर्णय होईल. मात्र पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेश वरपूडकर वॉर्ड निहाय अभ्यास करत आहे. पूर्ण ताकदीने भाजप या महापालिका निवडणुकीत उतरणार आहे” असं सुरज भुमरे म्हणाले.

जागांबाबत आमचं घोडं अडलेलं नाही

“मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे आज बैठक होणार आहे. त्या बैठकीत शिवसेनेसोबत युती संदर्भात स्थिती स्पष्ट होईल.जागांबाबत आमचं घोडं अडलेलं नाही. आज स्थिती स्पष्ट होणार आहे” असं सुरज भुमरे म्हणाले.

तर शिवसेना त्यांच्यात नसेल

पुणे, पिंपरी चिंचवड पालिकेत महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. “हा दोन पक्षांचा स्वतंत्र विषय आहे. शरद पवार यांनी आमच्याशीही चर्चा केली, येणाऱ्या काळात काय होईल माहिती नाही. मात्र, अजित पवार व शरद पवार एकत्र आले तर शिवसेना त्यांच्यात नसेल” असं अंबादास दानवे म्हणाले.