आम्ही हलक्यात कोणतीच गोष्ट घेत नाही.. रावसाहेब दानवे यांनी कोणाला दिला इशारा
लाडकी बहीण ही योजनेत श्रेयवाद नाही. कार्यकर्ते बॅनर त्यांच्या लेव्हलवर छापतात. सरकारी योजनेचे नाव मुख्यमंत्री लाडकी बहिण असे आहे. जेव्हा पक्षाचा कार्यक्रम असता तेव्हा वैयक्तिक बॅनर लागतात, जेव्हा सरकारी कार्यक्रम असतो तेव्हा तिघांचे पोस्टर लागतात असेही माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मीडियाशी संवाद साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 16 सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकांच्या तोंडावरच जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसल्याने भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे. मात्र माजी खासदार आणि जरांगे यांच्या आंदोलनामुळे आपली जालना सीट गमवाव्या लागणाऱ्या दानवे यांनी आम्ही कोणत्याच गोष्टी हलक्यात घेत नसतो. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि सक्षम आहोत असे म्हटले आहे.
मनोज जरांगे हे निवडणूका आल्याने वक्तव्यं करीत असावेत. परंतू आम्ही जोरदार तयारी केली आहे. जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची क्षमता आमच्याकडे आहे त्यामुळे आमच्यात निवडणूका जिंकण्याची क्षमता असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने संपूर्ण तयारी केली आहे. पुन्हा राज्यात NDA ची सत्ता आणण्याची तयारी केली आहे. प्रदेश ,जिल्हा आणि तालुका स्तरावर संपूर्ण काम चालू असल्याचे देखील दानवे यांनी म्हटले आहे.
भाजपाने विविध समिती केल्या आहेत. एका समितीचा मी स्वतः अध्यक्ष आहे.दिलीप कांबळे सह संयोजक आहेत .जाहीरनामा समितीमध्ये सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष आहेत.सामाजिक समितीमध्ये पंकजा मुंडे ह्या आहेत.प्रचार यंत्रणा समितीमध्ये रवींद्र चव्हाण आहेत. सहकारमध्ये प्रवीण दरेकर आहेत.सोशल मीडिया समितीमध्ये निरंजन डावखरे प्रमुख आहेत.राज्य पातळीपासून बुध लेव्हलपर्यंत या समित्या बनवल्या असल्याचे दानवे यांनी सांगितले आहे.
अजित पवार नाराज नाहीत
अजित पवार नाराज आहेत. ह्या बातमीत काही दम नाही, अफवा आहेत.कोण CM होणार हे निवडणुकीनंतर आमचे सर्व घटक पक्ष एकत्रित बसून निर्णय होईल. राज्यात महायुतीवतीने कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असेही माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.काही बोलल्याशिवाय त्यांचा ब्रेकफास्ट होत नसावा,पण त्यांनी सावध बोलले पाहीजे असे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांना सल्ला देताना सांगितले.