
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. राज्यातील बडे नेतेही एकमेकांवर टीका करत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बहुतांशी आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यावेळी विरोधकांकडून या आमदारांना प्रत्येकी 50 खोके(कोटी) दिल्याचा आरोप केला होता. शिवसेना ठाकरे गटाकडून अजूनही अशाप्रकारची घोषणाबाजी केली जाते. मात्र आता चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा एकत्र लढत आहे, असं असतानाही वॉर्ड क्रमांक 173 मध्ये ही घोषणाबाजी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपकडून शिल्पा केळुसकर यांना उमेदवारी मिळाली आहे, तर शिवसेनेकडून पूजा कांबळे यांनी उमेदवारी मिळाली आहे. या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
या घोषणाबाजी बाबत बोलताना भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी म्हटले की, ‘ते खांद्याला खांदा मिळवून काम करत नव्हते, त्यांनी मतदार पाहून दुसऱ्या पक्षातून इथे उडी मारली आहे.’ शिल्पा केळुसकर यांचे पती दत्ता केळुसकर यांनी म्हटले की, ‘त्यांच्या मागे असलेल्या लोकांना जाऊन विचारा की तुम्हाला दिवसाला किती पैसे मिळतात? हे लोक 1 हजार रुपये देऊन भाड्याने आणलेले लोक आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन लढावं. आमचं कमळ घेऊन का लढता हे त्यांना विचारा.’
शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी म्हटले की, ‘हे लोक मतदारांची दिशाभूल करणारे भाषण करत आहेत. ज्या व्यक्तीने पक्षाला फसवलं, डुप्लिकेट फॉर्म बनवले, चोरी केली अशा व्यक्तीवर जास्त बोलणं उचित नाही. त्याच्या पक्षाने त्याची FIR केलेली आहे.’ दरम्यान, ऐन निवडणुकीत आता भाजप आणि शिवसेनेच्या युतीत मिठाचा खडा पडला आहे. याचा फटका आता दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे.