दगड मारलाच नाही, शेतकऱ्याचा आरोप खासदार रामदास तडस यांनी फेटाळला, अतिक्रमणावरुन राडा

दगड मारलाच नाही, शेतकऱ्याचा आरोप खासदार रामदास तडस यांनी फेटाळला, अतिक्रमणावरुन राडा

नालीत उतरुन अशोक काकडे यांनी अतिक्रमणाला विरोध दर्शविला. पण, अचानक रामदास तडस यांनी नालीजवळील दगड उचलून नागरिकावर हाणला असल्याचा आरोप काकडे यांनी केला

Nupur Chilkulwar

|

Aug 02, 2020 | 7:04 PM

वर्धा : देवळी येथे वोट बँकसाठी तयार करण्यात आलेल्या (BJP MP Ramdas Tadas) नागरी वस्तीला खासगी जमिनीतून पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पालिकेने हेकेखोर भूमिका घेतली असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असून शेतकऱ्याने ही माझ्या मालकीची जागा असल्याचा दावा केला आहे. मात्र, पाईपलाईन अतिक्रमित जागेतूनच होईल, अशी भूमिका पालिकेने घेतल्याचं चित्र आहे (BJP MP Ramdas Tadas).

यावेळी जमिनीचा मालक असलेल्या देवळी येथील नागरिकाने पाईपलाईनच्या नालीत उतरुन विरोध केला. मात्र, तेथे उपस्थित असलेले भाजप खासदार रामदास तडस आणि नागरिक अशोक काकडे यांच्यात चांगलाच राडा झाला. अचानक पोलिसासमक्ष शिवीगाळ आणि दगडफेक करत राडा झाला. याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण आपण दगड मारलाच नाही, म्हणत खासदारांनी विषयलाच बगल दिली आहे. लोकांच्या पाणी प्रश्नासाठी आपण पुढे आलो असल्याचे खासदार तडस यांनी स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

देवळी येथील अशोक काकडे यांची शेत सर्व्हे क्रमांक 5 मध्ये 0.58 हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर बाबाराव गुजरकर यांच्यासह एकूण 47 जणांनी अतिक्रमण केले आहे. पक्की घरे बांधून आपला हक्क गाजवणाऱ्या या अतिक्रमित लोकांसह नागरिकांसाठी नागरी सुविधाही पुरविल्या आहेत. नगर परिषदेकडून पक्के रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी आणि नाली बांधकाम करुन नगरपालिकेने अतिक्रमणाला पाठीशी घातले आहे.

नगरपालिका एवढ्यावरच थांबली नाही, तर या खाजगी जागेत अतिक्रमण करुन घरकुल देखील मंजूर करण्यात आले आहेत. मूळ मालक असणाऱ्या अशोक काकडे यांनी तहसील कार्यालयात न्याय मागितला, तहसीलदारांनी देखील अवैध अतिक्रमण असल्याचा आदेश पारित केला आहे. पण अतिक्रमण न्यायालयाच्या माध्यमातून हटविले जावे असे आदेशात म्हटले आहे.

या अतिक्रमणातून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच बांधकाम होत असताना अशोक काकडे यांनी विरोध केला. अधिकारी न पोहोचता कामाच्या जागेवर स्वतः खासदार रामदास तडस पोहोचले. शेतकरी अशोक काकडे यांनी जमीन आपली आहे, त्यावर अतिक्रमण करु नका अशी विनंती केली. स्वतः नालीत उतरुन अशोक काकडे यांनी अतिक्रमणाला विरोध दर्शविला. पण, अचानक रामदास तडस यांनी नालीजवळील दगड उचलून नागरिकावर हाणला असल्याचा आरोप काकडे यांनी केला (BJP MP Ramdas Tadas).

पोलिसांनी खासदारांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. गोळा झालेल्या अनेक नागरिकांनी याचे व्हिडीओ चित्रित केले आणि समाजमाध्यमांवर देखील ते व्हायरल झाले. अखेर हे प्रकरण पोलिसात पोहोचले आहे.

या प्रकरणात मात्र खासदारांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. “देवळी येथील मिरननाथ मंदिराजवळील जागा यात्रेसाठी राखीव आहे. अशोक काकडे यांची जमीन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. देवळी नगर पालिकेने पाईपलाईन टाकायला सुरवात केली. काकडे आम्हाला नळ जोडणी घेऊच देत नसल्याची तक्रार नागरिकांनी खासदार रामदास तडस यांच्याकडे केली होती. मी काकडे यांना समजविण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे. पण काकडे ऐकायला तयार नाहीत. अतिक्रमण असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागितली पाहिजे. मी दगड उचलला नाही”, असे तडस यांनी स्पष्ट केले आहे. एवढंच नव्हे तर काकडे हे अतिक्रमण धारकांना धमकी देत पैशांची मागणी सुद्धा करत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.

सध्या हे प्रकरण देवळी येथील पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. दोन्हीकडील तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनेनंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेत खासदारांवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे (BJP MP Ramdas Tadas).

संबंधित बातम्या :

आधी बंद घरातून एटीएम चोरलं, मग स्वतःच्या खात्यावर पैसे टाकले, वर्धा पोलिसांची अट्टल चोरट्याला अटक

पाणी पिण्याच्या बहाण्याने घर गाठलं, गर्भवती पत्नीची गोळी झाडून हत्या, वर्ध्यात जवानाची आत्महत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें