स्वीकृत नगरसेवकांवरून भाजप-शिवसेना संघर्ष चिघळला! रवींद्र चव्हाणांवरील आरोपांनी BJP संतप्त; थेट पोलीस ठाण्यात…
Ulhasnagar Politics: उल्हासनगरमध्ये महायुतीत महाभडका उडाल्याचे दिसून आले आहे. भाजप-शिवसेना संघर्ष चिघळला आहे. कमलेश निकमांच्या विधानाने भाजप आक्रमक झाला आहे.

उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून शिवसेना आणि भाजपमधील वाद आता चांगलाच पेटला आहे. भाजपने महायुतीतून बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर या वादाला आणखी धार आली. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक विधान केले आहे. या विधानाविरोधात भाजपने उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेत कमलेश निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पोलिसांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कमलेश निकम यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगत भाजपकडून आपल्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही, तर आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोपही निकम यांनी केला आहे.
ल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला संघर्ष आता चिघळताना दिसत आहे. भाजपने पत्रकार परिषद घेत महायुतीतून बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली होती. तसेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नसल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले आहे. यानंतर शिंदे शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
कमलेश निकम यांनी रवींद्र चव्हाण यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि गंभीर स्वरूपाचं विधान केल्याचा भाजपचा आरोप आहे. या विधानानंतर भाजप आक्रमक झाली. भाजपच्या शिष्टमंडळाने उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेत कमलेश निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत निवेदन दिलं.यावेळी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. कमलेश निकम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपने शक्तिप्रदर्शन केलं.
या संपूर्ण प्रकाराची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. तर वरिष्ठांनी आदेश दिल्यास सभापतीपदाचा राजीनामा देण्याची भूमिकाही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेतल्यानंतर कमलेश निकम यांनी उल्हासनगर महापालिकेत येत भाजपविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी प्रतिक्रिया देताना निकम यांनी आपण केलेल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. भाजपच्या काही नेत्यांकडून आपल्या कुटुंबाला शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्याला उल्हासनगर महापालिकेत येऊ देणार नसल्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करत आपण महापालिकेत आलो असून ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी येऊन दाखवावं, असं आव्हानही निकम यांनी दिले आहे. शिवसेना आणि भाजपची युती आहे. मात्र आपण एका नेत्यावर केलेले आरोप सिद्ध असल्याचा दावा करत त्या आरोपांवरच आपण बोलत असल्याचे निकम यांनी म्हटले आहे.
तसेच भाजपच्या नेत्यांकडून आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोपही कमलेश निकम यांनी केला आहे. आपली हत्या झाल्यास त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जबाबदार असतील, असा दावा निकम यांनी केला आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील राजकीय वाद आता आरोप-प्रत्यारोपांबापलीकडे जाऊन पोलीस तक्रारी आणि आंदोलनाच्या इशाऱ्यापर्यंत पोहोचला आहे.