
BMC Elections : राज्यात महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी नाराज आहे. तिकीट न मिळाल्याने काही पदाधिकाऱ्यांनी तर मोठा संताप व्यक्त केला. काही ठिकाणी इच्छुकांच्या डोळ्यातून अश्रूही तरळले. काही इच्छुकांनी तर पक्षादेश डावलून थेट बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, आता नेते, पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचे वारे वाहत असताना मुंबईत ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे. येथे तिकीट न मिळाल्याने एका बड्या महिला नेत्याने ठाकरे गटाला रामराम ठोकून थेट भाजपात प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सिनेटच्या सदस्य शीतल देवरुखकर यांनी उल्हासनगर येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरुखकर यांचा भापजा प्रवेश झाला आहे. शीतल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या 51 क्रमांकाच्या वार्डमधून इच्छुक होत्या. त्यानी ही निवडणूक लढवण्यासाठी तयारीही केली होती. परंतु ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले.
त्यामुळेच नाराज होऊन त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला रामराम ठोकला. त्यांनी आता थेट भाजपात प्रवेश केला आहे. तिकीट वाटपादरम्यान माझे फोन उचलले नाहीत. माझ्या मेसेजेसला उत्तर दिले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, शीतल देवरुखकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्यामुळे ऐन महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीत देवरुखकर भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावतील. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे देवरुखकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपा एखादी नवी जबाबदारी देणार का? ही जबाबदारी कशी असेल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.