पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स… राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांशी गुप्त संवाद, उबाठाचा उल्लेख; काय म्हणाले?

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवले आहे. आज एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले.

पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स... राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांशी गुप्त संवाद, उबाठाचा उल्लेख; काय म्हणाले?
Shinde meets Corporator
Image Credit source: Google
| Updated on: Jan 18, 2026 | 10:08 PM

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईत भाजपला 89 आणि शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना 71 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. तर इतर आणि अपक्षांचा आकडा 12 इतका आहे. या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवले आहे. आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेत त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवकांनी संवाद साधला.

एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन

नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘कामाला लागा, कामाचा आराखडा तयार करा. जनतेला विकास पाहिजे. आपल्या प्रभागात लोकांना दिसून येईल असा बदल करा. आपण केलेले बदल लोकांच्या लक्षात यायला हवे. शिवसेनेची प्रतिमा डागाळली जाईल असे काम आपल्या हातून घडू नये याची खबरदारी घ्या. आपल्या प्रभागातील कामे उत्तम दर्जेदार व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आपल्या भागात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करा.’

भावनिक मुद्दे हारले आणि विकास जिंकला

निवडणुकीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, ‘भावनिक मुद्दे हारले आणि विकास जिंकला. भाजप आपला मित्र पक्ष आहे. महाराष्ट्राच्या जनतेने उबाठाला नाकारले आहे, जी संधी आपल्याला मिळाली आहे त्याचे सोनं करा. कोणत्याच जनतेला त्रास होऊ नये, खऱ्या अर्थाने नगर-सेवक व्हा अशी अपेक्षा आहे. वॉर्डात बदल दिसले पाहिजेत. जे निर्णय महायुतीच्या सरकारने केले आहेत त्याचा पाठपुरावा करा. आपली एकही तक्रार नसावी याची खात्री करा.’

नगरसेवक फिरताना आणि लोकांमध्ये दिसलाच पाहिजे – शिंदे

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘कोणत्याही कामाला नाही म्हणू नका. सकाळी लवकर उठून वॉर्डात फिरा, वार्ड स्वच्छ करून घ्या. पाणी आणि कचरा हे विषय लोकांच्या हिताचे आहेत. स्वच्छतेवर काटेकोर पणे लक्ष द्या. डीप क्लीन ड्राइव सुरू करा. मोठ्या कामांचे प्रस्ताव तयार करा. मार्केट, मंडई, व्यायाम शाळा, स्पोर्ट्स काम्प्लेक्स अशी मोठी कामे गाठी घ्या. आरोग्य सेवा दुरुस्त झालीच पाहिजे. नगरसेवक फिरताना आणि लोकांमध्ये दिसलाच पाहिजे. लोकांचे मत जाणून घ्या त्यांना विकासात भागीदार करा.’