
माझी काल रात्रीच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या शी चर्चा झाली. आज छगन भुजबळ आणि आम्ही एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. परस्पर त्यांनी काही निर्णय केला असेल तर मला माहिती नाही. आम्ही सांगितलेले आहे की आम्हाला महायुती मध्येच लढायचे आहे. वरतून देखील तसे आदेश आहे. त्यामुळे त्या मनस्थिती आहोत असे मंत्री गिरीश महाजन नाशिक महापालिकेबाबत म्हणाले.
महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या विरोधात कोण जर बोलत असेल तर त्याला आम्ही सुद्धा जशास तसे उत्तर देऊ. मिरा रोडच्या नया नगर मध्ये आम्ही रोजच जातो आणि हिंदुत्वाचा टीका लावून जातो. तुम्हाला जर प्रवचन द्यायचे असेल तर सगळ्या पक्षाला आव्हान करायला पाहिजे होते. चांगली काम करा आणि चांगली काम करून पोचपावती घ्या. मग मत मागायला जा तुमचे जे प्रवचन द्यायचं काम आहे तेच करत राहा असे संदीप राणे मनसे शहर अध्यक्ष यांनी म्हटले आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या युतीचे संकेत दिसत आहेत. काँग्रेस पदाधिकारी आणि उबाठा पदाधिकारी यांची अमरावतीत एकत्रित बैठक झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील देशमुख आणि उबाठाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांची युतीबाबत चर्चा झाली. उद्या सायंकाळी अधिकृत रित्या काँग्रेस आणि उबाठाची युती जाहीर होण्याची शक्यता असल्याची ठाकरे गटाचे पराग गुडधे यांनी माहिती दिली.
अमरावती महानगरपालिकेच्या जागा वाटपा संदर्भात दुपारी नागपुर येथे शिवसेना शिंदे गट,भाजप, युवा स्वाभिमान संघटनेची एकत्रित फायनल बैठक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने अमरावतीच्या स्थानिक भाजप, शिंदे गट आणि युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना नागपूरमध्ये बैठकीसाठी बोलावलं. आता अमरावती ऐवजी नागपुरात होणार महायुतीच्या जागावाटपा संदर्भात बैठक.
इतके वर्षे लढाई लढलो, मुंबई कोणी हिसकावू शकलं नाही. मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. भाजपने फक्त युती तोडली नाही, तर आपल्याला संपवायला निघालेले. युत्या होतात, तुटतात. दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेले. कोण ओळखत नव्हतं त्या भाजपला आपण खेडोपाडीत नेलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कृष्णराज महाडिकांनी महानगरपालिका निवडणुकीतून माघार घेतली आहे. पालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने धनंजय महाडिकांनी हा निर्णय घेतला आहे. काल कृष्णराज यांनी अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी हा अर्ज मागे घेतला आहे.
“नागपुरात महाविकास आघाडी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे. आज किंवा उद्यापर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहयोगी पक्षाने जागेसंदर्भात प्रस्ताव दिला त्यावर आमची चर्चा सुरू आहे. मात्र तोडगा निघाला नाही तर नागपुरात संपूर्ण 151 जागेवर आम्ही आमची तयारी करून ठेवली आहे. महाविकास आघाडी झाली तर सहयोगी पक्षांना आम्ही जागा सोडू, त्यांदर्भात आमची चर्चा झाली,” असं काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले.
खोपोली येथे खालापूर तालुक्यात घडलेल्या शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात फरार आरोपींना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, या हत्येच्या निषेधार्थ अलिबाग तालुक्यातील पोयनाड नाका येथे शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते . शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
“शिवसेना-भाजप जागावाटप होत आले आहे, किरकोळ राहिले असून यावर अंतिम चर्चा सुरू आहे. भगवा झेंडा फडकवण्याचं आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. येणाऱ्यांचा वेग दोन्ही पक्षात जास्त असल्याने थोडा निर्णय घेण्यासाठी वेळ लागत आहे. बाकी कोणतेही कारण नाही, आज किंवा उद्या सर्व ठिकाणी घोषणा होईल,” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
बीड तालुक्यातील नेकनूर जवळ अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये नेकनूर येथील किशोर निर्मळ नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर माजलगाव येथील सुनिल जाधव नामक व्यक्ती जखमी असून नेकनूर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
नाशिकमध्ये भाजपाच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहे. महायुतीत भाजप न आल्यास राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढणार आहेत. भाजपा आमचा मोठा भाऊ त्यामुळे आम्हाला भाजपकडून अपेक्षा आहेत. भाजपाकडून चर्चेसाठी दिरंगाई होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चर्चा झाली. शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी माहिती दिली. भाजपा आमचा मोठा भाऊ आहे मोठा घटक आहे मात्र मनाचा मोठेपणा पण लागतो – शिंदेंच्या शिवसेनेची भाजपवर नाराजी व्यक्त केली.
जळगावात वंचित बहुजन आघाडीने महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याची तयारी केली आहे.वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडी मध्ये निवडणुकीसाठी 18 जागांवर दावा केला आहे. जर सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या नाही तर आम्ही छोट्या घटक पक्षांना एकत्र घेऊन 75 जागांवर ही निवडणूक लढणार असल्याची माहिती, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी माहिती दिली.
चंद्रपुरात महानगरपालिकेसाठी शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होण्याची व्यक्त केली जात आहे. युतीची घोषणा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाऊ शकते. वंचितसोबत काँग्रेसची बोलणी सुरू असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती.मात्र आता वंचित शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता असल्याने राजकीय समीकरणे बदलू शकतात.नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात घवघवीत यश मिळाल्याने काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.
आंदेकरांना निवडणुक अर्ज भरण्याची परवानगी मिळाली त्यांना ती मिळायला नको होती. बंडू आंदेकरला काल अर्ज भरण्यासाठी आणले त्यांनी घोषणाबाजी केली. त्यांनी एक प्रकारे प्रचार केला. आंदेकरने लोकांची घर उध्वस्त केली. लोकांनी डोळे उघडले पाहिजे त्यांना मतदान केल नाही पाहिजे.त्यांना कोणत्या पक्ष्याने उमेदवारी देखील नाही दिली पाहिजे.मी शिवसेनामधून अर्ज भरलाय.मी अन्यायाच्या विरोधात लढतेय.अजित दादांनी त्यांना उमदेवारी दिली नाही पाहिजे. मी कोर्टात जाणार, असे कल्याणी कोमकर म्हणाल्या.
अटल फाउंडेशन तर्फे ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांना हा पुरस्कार दिल्ली येथे जाहीर करण्यात आला. ठाण्यात सुरु असलेल्या ठाणे मनपाच्या निवडणुकीत आ. केळकर यांना जबाबदारी असल्याने त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. भाजपा खोपट कार्यालय येथे अटल फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अपर्णा सिंह यांचे वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या हस्ते संजय केळकर यांना प्रदान करण्यात आला.
आज मुंबईच्या दादर टिळक भवन इथे भारतिय राष्ट्रीय काँग्रेसचा १४१ वा स्थापना दिन साजरा केला जातो.याची तयार पुर्ण झालीये.आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे ध्वजारोहण करणार आहेत.राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा हा स्थापना दिन अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कांग्रेस चे अनेक नेते या कार्यक्रमाला ऊपस्थित राहणार आहेत.आज वंचित सोबत युतीची घोषणा होणार खा हे पाहणं महत्वाचं असेल.काँग्रेस पक्षाची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी झाली होती आणि पहिले अधिवेशन मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेज येथे पार पडले होते. देशभरातील ७२ प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून व्योमेश चंद्र बॅनर्जी यांची निवड करण्यात आली होती.
चंद्रपुरात महानगरपालिका निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर भाजप नेते हंसराज अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या राजकीय वाद समोर आल्यानंतर चंद्रपूर येथील राजकीय परिस्थितीवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती सामोर येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रामगिरी वर सुमारे अर्धा तास चर्चा झाली. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. भाजपची उमेदवारी यादी अजूनही जाहीर झाली नाहीय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस
राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. सोलापूर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युतीची बोलणी पुढे सरकत नसल्याने शिंदे गट अस्वस्थ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. मात्र काल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युतीच्या हालचालींनी वेग पकडला
युती बाबत आम्ही उमेदवारांची यादी वरिष्ठांना पाठवली आहे, त्यावर आज निर्णय होईल. आम्हाला वाटते आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आमचे असल्याने आणि शहराचा विकास झाला पाहिजे म्हणून महापालिका युतीच्या ताब्यात पाहिजे. महापालिकेला कोट्यवधीचा निधी येतो आणि त्यामुळे भाजपाचा महापौर असावा असे आम्हाला वाटते
मनपा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यासाठी उरले अवघे दोन दिवस. अजूनही उमेदवारी जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये वाढली धाकधूक. उमेदवारी पक्की करण्यासाठी सर्वोच्च नेत्याला भेटण्यासाठी आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे. सकाळपासून रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि इच्छुकांची गर्दी
सांगली च्या शेतकऱ्याचा ‘नादच खुळा म्हंटलं तर वावग ठरणार नाही कारण सांगली जिल्ह्यात बिबट्या चे हल्ले आणि वावर वाढले आहेत त्यामुळे बिबट्याला रोखण्यासाठी सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील सुधीर चव्हाण या जिद्दी शेतकऱ्याने चक्क काचेच्या बाटल्यांचं अनोखं ‘जुगाड’ करून स्वतःच ”स्वदेशी अलार्म” तयार केला आहे
उद्योजक गाैतम अदानी बारामतीत पोहोचले असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार अदानींचे स्वागत करण्यासाठी पोहोचले आहेत.
नाशिकमध्ये अद्याप युती आघाडीची घोषणा नाही मात्र प्रचार साहित्यांनी बाजारपेठा सजल्या. विविध पक्षांचे गमचे ,झेंडे बिल्ले , हातातील बँड बाजारात उपलब्ध. बाजारपेठांमध्ये प्रचार साहित्यांनी दुकाने सजले. उमेदवारीसाठी केवळ दोन दिवस शिल्लक त्यानंतर प्रचाराला येणार वेग
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून इच्छुक उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अंतिम टप्प्यात असला तरी, ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज भरताना तांत्रिक चुका टाळण्यासाठी प्रक्रियेची माहिती घेऊन अर्ज व्यवस्थित भरण्याबाबत पक्षाकडून विशेष निरोप धाडण्यात आले आहेत. जागावाटपाची अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने, इच्छुकांनी आपापल्या प्रभागात संपर्क वाढवून निवडणुकीसाठी पूर्णतः सज्ज राहावे, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या रणांगणात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची पहिली प्रतीक्षा अखेर संपण्याची शक्यता आहे. पक्षाने आज रविवारी रात्री उशिरा पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी २६ तारखेचा मुहूर्त हुकल्याने आता आजचा मुहूर्त तरी पक्ष साधणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या यादीत दिग्गज आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्या ‘सगेसोयऱ्यां’साठी अनेक नेत्यांनी दिल्लीपासून मुंबईपर्यंत फिल्डिंग लावली आहे. एकीकडे घराणेशाहीवर टीका करणारा भाजप आपल्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊन ‘घराणेशाही’ला अभय देणार की निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांना आता प्रचार सभा आणि रॅलींसाठी प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. मनपा प्रशासनाने प्रचार सभा, कॉर्नर सभा आणि चौक सभांसाठी अधिकृत दर निश्चित केले आहे. विनापरवानगी सभा घेतल्यास संबंधित उमेदवाराला दीडपट दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, सरकारी बागेत कोणत्याही राजकीय झेंडे किंवा बॅनरला मनाई करण्यात आली असून, रस्त्यावर १० बाय १० फुटांचा प्लॅटफॉर्म उभारताना खड्डा खोदल्यास प्रति खड्डा २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. उमेदवारांची धावपळ थांबवण्यासाठी आणि सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करण्यात आली असून, पोलिसांची परवानगी आणि विहित शुल्क जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या विद्यमान ताकदीवर विश्वास दर्शवत बहुतांश माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी नगरसेवकांना ‘अभय’ देत त्यांची उमेदवारी कायम ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने स्थानिक पातळीवर उमेदवारीसाठी असलेल्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. प्रभागातील नाराजी किंवा अँटी-इन्कम्बन्सी (सत्ताविरोधी लाट) लक्षात घेऊन काही ठिकाणी बदलाची चर्चा होती, मात्र ऐन निवडणुकीच्या काळात अंतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाने हा जुनाच फॉर्म्युला वापरण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, बाहेरून येणाऱ्या नेत्यांची (इनकमिंग) संख्या मोठी असताना, आपल्या निष्ठावान माजी नगरसेवकांची नाराजी ओढावून घेण्याची जोखीम भाजपने टाळली आहे. या निर्णयामुळे जुन्या अनुभवी चेहऱ्यांना पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा पेच आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात आज रविवारी रात्री मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांच्या जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. प्रलंबित जागांवर एकमत घडवून आणण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते प्रयत्नशील असून, बंडखोरी टाळण्यासाठी अत्यंत गोपनियतेने हा निर्णय घेतला जाणार आहे. आजच्या या बैठकीनंतर महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शनिवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे शहरात तिरंगी लढत होण्याची शक्यता बळावली आहे. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी तिन्ही घटक पक्षांना प्रत्येकी ५० जागा मिळतील असे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा पेच अद्याप कायम असून, त्यावर आज मुंबईत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत कलह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक आपला अधिकृत ताफा सोडून खासगी गाडीने रवाना झाल्याच्या चर्चेने शनिवारी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस उलटले असले, तरी प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाहीर न केल्याने अर्ज भरण्याचा वेग प्रचंड मंदावला आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या २१ अर्जांमध्ये बहुतांश अपक्ष उमेदवारांचा समावेश असून, युती आणि आघाडीमधील जागावाटपाचा पेच तसेच बंडखोरीच्या भीतीने पक्षांनी इच्छुकांना अद्याप ‘वेटिंग’वर ठेवले आहे. रविवारच्या सुट्टीमुळे आज अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, परिणामी आता सोमवार आणि मंगळवार असे केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर आणि उमेदवारांवर मोठी ओढताण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालेगाव महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया आता रंगात आली असून, एकूण १३८१ अर्जांची विक्री झाली आहे. यातून ७१८ इच्छुकांनी आपली दावेदारी दर्शवली असून, आतापर्यंत ४ उमेदवारांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, या अर्ज विक्रीतून महानगरपालिकेच्या तिजोरीत २.६२ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. राजकीय समीकरणे पाहता, समाजवादी पक्षाने १४, काँग्रेसने ८, AIMIM ने ९ आणि इस्लाम पार्टीने २७ उमेदवारांची अधिकृत घोषणा करून आपली रणनीती स्पष्ट केली आहे. मात्र, दुसरीकडे अर्ज भरण्यासाठी अवघे २ दिवस उरले असतानाही शिवसेना-भाजप युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. इतर सर्व पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असताना युतीमधील या विलंबामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा भाजप ५४ आणि शिवसेना ६८ जागांचा फॉर्म्युला ठरला असतानाच, कल्याण पूर्वेत मात्र याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजपच्या वाट्याला केवळ ७ जागा आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेरील परिसरात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. “युती नको, भाजप स्वबळावर लढेल” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या या उग्र पावित्र्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असून, या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या वादामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.
राज्यातील २७ महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस (सोमवार आणि मंगळवार) शिल्लक असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड धाकधूक वाढली आहे. विशेषतः भाजपची पहिली उमेदवारी यादी आज रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची झोप उडाली आहे. २६ तारखेचा मुहूर्त हुकल्यानंतर आता आजची ही यादी नक्की येणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अनेक दिग्गज आमदार आणि खासदारांनी आपल्या नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावली असून, घराणेशाहीवरून पक्षात कोणते निकष लावले जातात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तर दुसरीकडे, प्रशासनाने प्रचारासाठी कडक नियमावली जाहीर केली असून विनापरवानगी सभा घेतल्यास दीडपट दंडाची तरतूद केली आहे. पुण्यात ९ हजारांहून अधिक अर्ज विक्री होऊनही केवळ ३८ जणांनी प्रत्यक्ष अर्ज भरले आहेत, तर नागपुरातही १५१ जागांसाठी अवघे २१ अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंकडून बंडखोरी रोखण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली जात असल्याने, शेवटच्या ४८ तासांत निवडणूक कार्यालयांमध्ये मोठी गर्दी आणि राजकीय नाट्य पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. यासह देश विदेश, महाराष्ट्र, मनोरंजनव, क्रीडा, राजकारण या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.