गतिमान सरकारची एसटी पहिल्या गिअरवरती, ५० किलोमीटरसाठी तीन तास
आज एसटीच्या दोन घटना उजेडात आल्या आहेत. एक सांगली जिल्ह्यातील आहे, तर दुसरी घटना बुलढाणा जिल्ह्यातील आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी नेमका काय जुगाड केलाय हे तुम्हाला पाहायला मिळत आहे.

बुलढाणा : जिल्ह्यात एसटी (ST bus) बसचे दीड वर्षात 99 अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये सिंदखेड राजा (sindhkhed raja) तालुक्यात नुकताच अपघात होऊन यामध्ये सहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अजूनही एसटी महामंडळाला (MSRTC) जाग आलेली दिसत नाही. काल पुन्हा एकदा क्लच नसलेल्या एसटी बसने रस्त्यावर प्रवास केला आहे. एसटीच्या बस खराब आहेत, तर त्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून का चालवल्या जात आहेत असा प्रश्न प्रवाशांनी केला आहे. बुलढाण्यात काल झालेला प्रकार सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे प्रवाशांनी जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे चालकाने पहिल्या गिअरवरती ५० किलोमीटर बस चालवली.
मलकापूर आगार, बुलढाणा ते मलकापूर या बसचा क्लच गेल्यानंतर देखील बस रिकामी न करता, चालकाने बसमध्ये प्रवाशी घेऊन येण्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बस चालकाने प्रवाशी घेऊन पहिल्या गिअर वरचं ही बस चालवत आणली, 50 किलोमीटरचा प्रवास हा एक तासाचा प्रवास पूर्ण करायला या बसला तब्बल तीन तास लागले. यादरम्यान प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. या संपूर्ण घटनेने एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, आता तरी एसटी महामंडळ धडा घेऊन हा संपूर्ण प्रकार टाळेल का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. या प्रकरणात मात्र एसटी महामंडळाचा कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार नाही.
सांगली जिल्ह्यात सुध्दा असाच प्रकार उजेडात आला आहे. बस खराब झाली, त्यानंतर चालकाने आपल्याकडे स्टेअरिंग ठेवलं आणि महिला कंडक्टरकडे अॅक्सिलेटरची दोरी दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
