परळीत मतदानाच्या दिवशी पवार गटाच्या उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याचं प्रकरण, 82 दिवसांनी पोलिसांना जाग, कैलास फडसह 7 जणांवर गुन्हा दाखल
परळीत विधानसभा मतदानादिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला असून तब्बल 82 दिवसांनी पोलिसांना जाग आली आहे. याप्रकरणी कैलास फडसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्यावेळी परळी शहरातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता. याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक कैलास फड आणि त्याचा मुलगा निखीलसह एकूण सात लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 82 दिवसांनी पोलिसांना जाग आली असून त्यांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल झाला.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी परळी शहरातील मतदान केंद्रावर गोंधळ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी बीड पोलिसांनी मोहन दांडगे यांची बॉडीगार्ड म्हणून नेमणूक केली होती. मात्र त्यांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आले होते. एवढंच नव्हे तर कोण पोलिस, कशाचा बॉडीगार्ड असे म्हणत मध्ये कोणीही जायचे नाही म्हणून त्या बॉडीगार्डला बाहेर काढले होते. शिवाय कार्यकर्ते ॲड. माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर अडीच महिन्यांनी बीड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणात कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे बॉडीगार्डने जबाबात नमूद केलं.
विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात यावेळी गोंधळ झाला होता. अनेक केंद्रांवरील वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तसेच शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना शिवीगाळ केली. त्यांचे सहकारी ॲड. माधव जाधव यांना मारहाण झाली होती. याचे सर्व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती. आता याच प्रकरणात देशमुख यांच्या अंगरक्षकाचा अडीच महिन्यांनंतर जबाब घेण्यात आला आहे. त्यावरून कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर चार ते पाच जणांविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
राजेसाहेब देशमुख मतदान केंद्रावर जात असताना मी बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या मागे जात होतो , तेव्हा कैलास फड तिथे होता. त्याने मला मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखलं . मी पोलिस आहे, देशमुख यांचा बॉडीगार्ड असल्याचं त्यांना सांगितलं, तरीही कैलास फडने मला रोखलं. कोण पोलिस, कशाचा बॉडीगार्ड असे म्हणत मला अडवले. तसचे कैलास फडच्या मुलाने, निखिलनेही कोणीच मध्ये जायचं नाही सांगत रोखलं, हाताने थांबण्याचा इशारा दिला. असा जबाब बॉडीगार्डने दिला होता.