ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, भाजपकडून उद्धव ठाकरे यांना पाच प्रश्न; काय दिलं चॅलेंज?

माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीतून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला होता. या मुलाखतीवरूनच बावनकुळे यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंची मुलाखत ही काळूबाळूचा तमाशा असल्याची टीकाही त्यांनी केली.

ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, भाजपकडून उद्धव ठाकरे यांना पाच प्रश्न; काय दिलं चॅलेंज?
chandrashekhar bawankule
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 12, 2024 | 10:26 AM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मुलाखत देऊन खळबळ उडवली आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपला राममुक्त करण्याची घोषणा करतानाच भाजपला देशातील प्रश्न दिसत नाहीत. त्यांना फक्त उद्धव ठाकरे यांना संपवायचं आहे, असा जोरदार हल्लाही त्यांनी चढवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना पाच सवालही केले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

भाजपचे पाच प्रश्न

1. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?

2. 1993च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?

3. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

4. राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?

5. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.