‘उबाठा’ नावावरून उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं नवं नाव काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उबाठा म्हणून हिणवलं जातं. विरोधकांच्या या हिणवण्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचं संशिप्त नाव दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे एसंशिं आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला मिंधे गट असं नाव देऊन जोरदार हल्ला चढवला होता. आता त्यांनी उबाठाला प्रत्युत्तर म्हणून एसंशिं असं प्रत्युत्तर दिलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीचा आज पहिला भाग होता. या पहिल्या भागातून उद्धव ठाकरे यांनी मोदी, भाजप, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे, ‘एसंशिं…’ म्हणजे त्यांचे जे पूर्ण नाव आहे, ते हेच आहे. पण मी त्यांचं पूर्ण नाव घेऊ इच्छित नाही. जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे, ए सं शिंदे त्याचा फुलफॉर्म काय आहे? असा सवाल त्यांनी केला. त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आईशी हरामखोरपणा केला
एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली. त्याचा राग राज्यातील जनतेला आलेला आहे. तुम्ही गद्दारी करून राजकारणातल्या आईशी हरामखोरपणा केलात, शिवसेनेशी गद्दारी केलीत. तुम्हाला राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवर तर तुम्ही वार केला, पण महाराष्ट्राशीही तुम्ही गद्दारी केलीत. ती महाराष्ट्रात नाही चालणार! तुम्ही शिवसेनेशीच गद्दारी नाही केली. तर महाराष्ट्राचाही घात केला आहे. मोदींनी उद्योगधंदे गुजरातला पळवले. हे फक्त पाहत बसले होते, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
कुणाच्या आशीर्वादाने घडतंय?
मराठी माणूस कधीच कुठल्याही राज्यात दादागिरी करत नाही. मग महाराष्ट्रात जे काही चाललंय ते कुणाच्या आशीर्वादाने घडतंय? मराठी द्वेष्टय़ांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का? हा प्रश्न आहे. त्यांना जे दाखवायचं ते मराठी माणूस दाखवून देईल. भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिमसुद्धा… कोरोना काळामध्ये आपण जे काम केलं, ते हे लोक कधीच विसरलेले नाहीयेत. मी कधीच जात व प्रांतभेद केला नाही, असंही ते म्हणाले.
