100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचं आश्वासन ऊर्जामंत्र्यांचंच : चंद्रशेखर बावनकुळे

"कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसामध्ये नाही", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले (Chandrashekhar Bawankule slams Nitin Raut).

100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचं आश्वासन ऊर्जामंत्र्यांचंच : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : “राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वत: 100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन प्रत्यक्षात साकारण्यात आलं नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका”, असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे ठणकावून म्हणाले (Chandrashekhar Bawankule slams Nitin Raut).

राज्य सरकारने वीज बिलं कमी करावं, यासाठी आज राज्यभरात भाजपकडून महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात चंद्रशेखर बावनकुळे, आमदार देवयानी फरांदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

“थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा पाठविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला”, असा दावा बावनकुळे यांनी केला (Chandrashekhar Bawankule slams Nitin Raut).

“कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. राज्य सरकारच्या या जुलमी कारभारा विरोधात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. भाजप कार्यकर्ते आंदोलन करून थांबणार नाहीत. भाजप कार्यकर्ते वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील”, असा इशारा त्यांनी दिला.

“कोरोना काळात गोरगरीब, श्रमिकांचे, छोट्या व्यावसायिकांचे उत्पन्न थांबले होते. असे असतांना महावितरणने अनेकांना हजारो, लाखो रुपयांची वीजबिले पाठविली. ही चुकीची बिले दुरुस्त करून देण्याऐवजी महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत”, असं बावनकुळे म्हणाले.

“कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसामध्ये नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही”, असंदेखील ते म्हणाले.

हेही वाचा : फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांनी दिले सत्तांतराचे संकेत

Published On - 7:37 pm, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI