
छगन भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहेत , त्यांना जेलमध्ये घाला अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. भुजबळ हे सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांपैकी काही मागण्या सरकारने गेल्या आठवड्यात मान्य केल्या. राठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून ओबीसी मात्र नाराज झाले असून महायुतीमधील मंत्री असलेले छगन भुजबळ यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा शासन निर्णय रद्द करावा किंवा त्यात सुधारणा करावी, अशी मागणी करत यासंदर्भात याचिका दाखल करणार असल्याचे काल भुजबळ म्हणाले होते.
मात्र भुजबळांच्या खोडा घालण्याच्या या भूमिकेमुळे मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले असून त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे.
फडणवीसांना भुजबळांमुळे डाग लागू नये, त्यांना पुन्हा आत टाका
सरकारचा आणि मराठ्यांचा रोष आता कुठे कमी होतोय. भुजबळांमुळे तो वाढू नये. आणि देवेंद्र फडणवीसांना भुजबळांमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर त्यांना जेलमध्ये जाऊ दिलेलं बरं, कारण त्यांना तुम्हीच (सरकारने) बाहेर आणलं, आणि आता तुम्हालाच ते परत घातक बनणार असतील तर त्यांना पुन्हा जेलमध्ये टाका, तेच बरं. नाहीतर फडणवीस साहेबांच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लावू शकतो असं जरांगे म्हणाले.
भुजबळ सरकारसाठी डोकेदुखी
कारण त्यांना इतका प्रसिद्धीची, नावाची आणि चलतीची माज आणि मस्ती आहे. सरकारचं नाही माझं ऐकायचं असं त्यांचं (भुजबळ) म्हणणं आहे. तू काय बाप लागून गेला का सगळ्यांचा, तुलाच खूप अक्कल आहे, सरकारला अक्कल नाही का ?असा सवाल विचारत जरांगेंनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला. हे ( भुजबळ) बिनडोक आहेत, त्यांनी (सरकारने) त्याला सोडवून आणलं. आणि आज तेच भुजबळ सरकारसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरत आहेत, असंही जरांगे म्हणाले.