Chiplun Flood : चिपळूणमध्ये पावसाचा हाहा:कार; 7 बोटींद्वारे बचावकार्य सुरु, आतापर्यंत 75 लोक सुरक्षितस्थळी- अनिल परब

आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर परिषद, स्थानिक लोक, एनजीओ आणि कोस्ट गार्डकडून बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

Chiplun Flood : चिपळूणमध्ये पावसाचा हाहा:कार; 7 बोटींद्वारे बचावकार्य सुरु, आतापर्यंत 75 लोक सुरक्षितस्थळी- अनिल परब
चिपळूणमध्ये महापूर


रत्नागिरी : चिपळूणमध्ये अक्षरश: ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सर्व रस्ते, दुकानं, घरं, बसस्थानक सर्वकाही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर (Flood) आला आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. अशावेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर परिषद, स्थानिक लोक, एनजीओ आणि कोस्ट गार्डकडून बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. (Rescue operation started by 7 boats in Chiplun, Information by Anil Parab)

चिपळूणमध्ये सध्या 7 बोटीद्वारे बचावकार्य सुरु असल्याची माहिती परब यांनी दिली. एकूण किती लोक अडकून पडले आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही मात्र, आतापर्यंत 75 नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. गरज भासल्यास लोकांना एअरलिफ्ट करण्याची तयारीही राज्य सरकारनं केल्याचं परब म्हणाले. रत्नागिरीमधून बैठक आटोपून अनिल परब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. मात्र, चिपळूणमध्ये जाण्यास कुठलाही मार्ग नसल्यामुळे परब आणि सामंत हे निवळीमध्ये अडकले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते 2005 पेक्षाही भयावह स्थिती निर्माण झाल्याचं उदय सामंत म्हणाले.

दरम्यान, घरांमध्ये आणि अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना परिसरातील गावांमध्ये नेण्याचं काम सुरु आहे. सावर्डे आणि परिसरातील गावांमधील शाळांमध्ये या नागरिकांची व्यवस्था केली जाणार आहे. पुढील 2-4 दिवस या नागरिकांना फुट पॅकेट्सद्वारे जेवण पुरवण्याची व्यवस्था केल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

भरती आणि जोरदार पाऊस एकाचवेळी आल्याने पूरस्थिती

हायटाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूण मध्ये गंभीर परिस्थिती आहे असे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु केले आहे. तर रत्नागिरी मधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत.

पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे (खेड साठी 1 व चिपळूण साठी 1) येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणेत येत आहेत. तातडीची गरज लगल्यास 94202 44937 अजय सूर्यवंशी, आपत्ति निवारण अधिकारी यांना संपर्क करावा असे आव्हान करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Chiplun Flood: चिपळूण जलमय, ढगफुटीने हाहाकार; बाजारपेठेत 5 फुट पाणी, अनेक जण पुरात अडकले, 2005च्या पुनरावृत्तीची भीती

Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय, 2005 पेक्षाही भयंकर पूर, खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे

Rescue operation started by 7 boats in Chiplun, Information by Anil Parab

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI