Santosh Deshmukh Murder : मोठी बातमी ! संतोष देशमुख मर्डर प्रकरणातून दोघांना वगळलं, आरोपपत्रात नाव नाही?; कोण आहेत दोघे?

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचं आरोपपत्र दाखल झाल्यावर खटला चालवला जाईल. उज्जवल निकम बाजू मांडतील. सीआयडीने गोळा केलेल्या पुराव्यावर युक्तिवाद होईल. सहा महिन्याचा अवधी असताना दोन महिन्यात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे आता या खटल्याची लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Santosh Deshmukh Murder : मोठी बातमी ! संतोष देशमुख मर्डर प्रकरणातून दोघांना वगळलं, आरोपपत्रात नाव नाही?; कोण आहेत दोघे?
santosh deshmukh case
Image Credit source: social
| Updated on: Mar 01, 2025 | 2:07 PM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. अवघ्या दोन महिन्यातच सीआयडीने हे आरोपपत्र दाखल केलं आहे. या 1800 पानाच्या आरोपपत्रात सीआयडीने संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणातून दोघांची नावे वगळण्यात आली आहेत. सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांना आरोपपत्रातून वगळलं आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याने त्यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ सोनावणे हा माफीचा साक्षीदार होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सीआयडीने तब्बल दोन महिने संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास केला. देशमुख यांनी 1800 पानाचे आरोपपत्र तयार केलं आहे. त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच ही संघटीत गुन्हेगारी असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. सिद्धार्थ सोनावणे हा या हत्येच्या आरोपातील आरोपी होता, त्याला या प्रकरणातून वगळण्यात आलं आहे. त्याच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे आरोपपत्रात त्याचं नाव टाकण्यात आलेलं नसल्याची माहिती आहे.

त्यांचंही नाव वगळलं

ॲट्रोसिटीच्या प्रकरणात रणजित मुळे नावाचा आरोपी होता. त्यालाही या प्रकरणातून वगळण्यात आलं आहे. त्यांचंही नाव आरोपपत्रात नाही. त्यांच्याही विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. संतोष देशमुख हत्या, दोन कोटीचं खंडणी प्रकरण आणि ॲट्रोसिटी अशा तीन प्रकरणाचा एकत्रित तपास करून सीआयडीने हे आरोपपत्र दाखल केलं आहे. वाल्मिक कराडच हाच या प्रकरणाचा सूत्रधार होता. त्याच्या सांगण्यावरून हत्या झाली, असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

व्हिडीओ रेकॉर्डिंगचं वर्णन

9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली. सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना अमानूष मारहाण करतानाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं. या व्हिडीओ रेकॉर्डिंगचा आधार घेऊन सीआयडीने आरोपपत्रात व्हिडीओचं वर्णन केलं आहे. व्हिडीओत सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारहाण करत होता, याची माहिती दिली आहे.

सतत अडथळा ठरत होते…

संतोष देशमुख दोन कोटीच्या खंडणी प्रकरणात सतत अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये बीडच्या कोर्टात सीआयडीने दिली होती. आता तीच माहिती आणि संपूर्ण घटनाक्रम सीआयडीने आरोपपत्रात मांडला आहे. त्याच्या म्हणण्यानुसारच हत्या केली. वाल्मिक कराडने कशी भूमिका निभावली? विष्णू चाटेचा रोल काय? घुलेने कसं अपहरण केलं? याचं वर्णन आरोपपत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.