वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाइंड… सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय?; म्हणाल्या, दोन लोकांमुळे…
मुख्यमंत्र्यांनी ओएसडी आणि पीएला जो कायदा लावला, तोच कायदा आमदार आणि खासदारांना का नाही? आम्हालाही तोच नियम लावा. महाराष्ट्राचं नाव देशात खराब झालं आहे. दिल्लीत भेटणारे मला बीडबाबत विचारतात. महाराष्ट्राची बदनामी दोन लोकांच्या गलिच्छ कृतीमुळे झालं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात खंडणीखोर वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपपत्रातून ही गोष्ट उघड झाली आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शरद पवार यांच्या नेतृत्वातीली राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. दोन लोकांनीच राज्याची बदनामी केली आहे. बीडचे लोक साधे आणि सरळ आहेत. परळीचे लोकही साधे आणि सरळ आहेत. पण दोन लोकांनी राज्याची वाट लावली आहे. राज्याची बदनामी केली आहे. कुणी तरी मागे असल्याशिवाय इतका मोठा गुन्हा कराड करूच शकत नाही, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. वाल्मिक कराडचं नाव आरोपपत्रात आल्याचं मला काही आश्चर्य वाटत नाही. अमानूष पद्धतीने बीडमध्ये खून झाला आहे. मला एकच प्रश्न आहे की, या व्यक्तीची हिंमतच कशी झाली? यांना अमानुष वागण्याचा अधिकार कोणी दिला? कोणी तरी मोठी व्यक्ती त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार बीडमध्ये होईलच कसा?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
आरोपी फरार कसा?
दुर्देव आहे. या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली. 70-75 दिवस झाले तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. तो सापडत का नाही? मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? यांनी दिल्लीशी संपर्क साधला का? केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधला का? एक सातवा खूनी 70-75 दिवस फरार कसा असू शकतो? सरकारला प्रश्न पडत नाही?, असे सवालच सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले.
धसांचं स्टेमेंट
सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे. तिकतेची आणि यांची कधीच भेट झाली नाही, असं सुरेश धस म्हणाले होते. दिवस जसे जात आहेत तसं सुरेश धस यांच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब होतंय. यांची आणि नैतिकतेची भेट कधीच झाली नाही. यांच्याकडून काय अपेक्षा करणार? बीडमधील कोणती केस राहिलीय. खून, भ्रष्टाचार, खंडणी, पीक विम्यात फसवणूक, हार्वेस्टरमध्ये घोटाळा, डोमेस्टिक व्हायलन्स… आता कोणता गुन्हा राहिलाय? असा सवालही त्यांनी केला. मी पहिल्या दिवसापासून सांगतेय. मी कधीच खोटेनाटे आरोप करत नाही. आवदा नावाच्या कंपनीने तक्रार केली तेव्हाच या हैवानांना आवरले असते तर वैभवीचे वडील गेले नसते, असंही त्या म्हणाल्या.
दहशत मोडून काढायची
महादेव मुंडे, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मी भेटले. या तिन्ही कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. त्यांना न्याय मिळणं ही नैतिकता आहे. काही लोकांनी सोडली असेल. आपण सोडली नाही. महाराष्ट्रातील मीडियाचे आभार मानते. तुम्ही तिन्ही कुटुंबांना न्याय देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले. तुमच्यावरही दहशत होती. तरीही तुम्ही जाऊन कव्हर केलं. आपल्याला ही दहशत मोडून काढायची आहे, असं त्यांनी सांगितलं.
