
राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा समारोप होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवेदन मांडत असताना विरोधकांनी विदर्भाला काय दिलं या मुद्द्यावरुन गदारोळ केला. विरोधकांनी केलेल्या गदारोळाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये राज्याच्या विकासाचे व्हिजन, योजनांची अंमलबजावणी आणि ऐतिहासिक निर्णयांवर जोर दिला गेला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील. तसेच सीबीएसई अभ्यासक्रमात २१ पानांचा शिवरायांचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे, अशी महत्त्वपूर्ण निर्णयाची यावेळी फडणवीसांनी दिली.
महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. यात २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र कसा असेल याबद्दल प्रत्येक विभागाचा रोडमॅप आहे. त्याचे २०३०, २०३५ आणि २०४७ असे तीन टप्पे आहेत. मला विश्वास आहे की २०२९-२०३० मध्ये देशातील पहिली ट्रिलियन अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची असेल. त्या दृष्टीने आपले कार्य सुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप सादर करताना म्हटले.
निवडणुका झाल्यानंतर योजना बंद होतील, या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी ठामपणे उत्तर दिले. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज योजना यापैकी कोणतीही योजना बंद केलेली नाही. सर्व योजना सुरु आहेत. यापुढेही पुढील ५ वर्ष ही योजना सुरुच राहणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंतिम आठवड्यातील भाषण सुरू असताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ सुरू केला. यामुळे संतप्त झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी एका आमदाराला उद्देशून म्हणाले, “तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेले आहात. तुम्हाला या सभागृहाची शिस्त माहिती नाही. या सभागृहाचा डेकोरमही माहिती नाही.” असे खडसावले.
“या सभागृहात जेव्हा मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात, ती एक शिस्त असते. मी जर तुलनात्मक बोलायला लागलो की मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं, तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही, लक्षात ठेवा.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, गदारोळ वाढत असल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन वेळा खाली बसा, खाली बसा असे सांगून असं काम होत नाही असे विरोधकांना बजावले.