रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूर परिस्थिती, सतर्क राहून बचाव कार्य करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला.

  • Updated On - 3:06 pm, Thu, 22 July 21 Edited By: Namrata Patil
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूर परिस्थिती, सतर्क राहून बचाव कार्य करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

मुंबई : गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा सांगितला आहे. या ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (CM Uddhav Thackeray Review at the meeting heavy rains Flood Ratnagiri and Raigad districts in last 24 hours)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे आणि काळजीपूर्वक काम करावे. कोविड  रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली.

अनेक नद्या धोका पातळीवरुन वाहतात

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 9 मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत आहे. यामुळे कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे आणि परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे, तसेच इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी  धोका पातळी वरून वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी , उल्हास या नद्या देखील इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या 24 तासांत 480 मिमी पाऊस झाल्याने सावित्री आणि इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

धरण परिसरात देखील जोरदार पाऊस

भातसा धरण परिसरात गेल्या 24 तासांत 336 मिमी पाऊस झाला असून धरण 63 टक्के भरले आहे. तर सूर्या धरण परिसरात 156 मिमी पाऊस झाला असून ते देखील 63 टक्के भरले आहे.

बारावी परिसरात देखील 256 मिमी पाऊस झाला. त्यामुळे धरण 62 टक्के तर मोरबे धरणही 260 मिमी पाऊस झाल्याने 71 टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

(CM Uddhav Thackeray Review at the meeting heavy rains Flood Ratnagiri and Raigad districts in last 24 hours)

संबंधित बातम्या : 

कोकणाला झोडपलं, आता विदर्भाचा नंबर, IMD कडून विदर्भाला ऑरेंज अ‌ॅलर्ट, चंद्रपूर गडचिरोलीत अतिवृष्टी तर नागपूरला मुसळधार

Konkan Flood: वर्षभरात कोकणाला तिसरा फटका, आतातरी सरकारने मदत द्यावी: देवेंद्र फडणवीस

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI