आतापर्यंत हात जोडलेत, फेक व्हिडीओने महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अन्यथा… : मुख्यमंत्री

समाजात दुही निर्माण करण्याचा वायरस पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल,तर कोविडपासून मी वाचवेन पण अशा वृत्तींना वाचवणार नाही, असेही उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray On Corona Virus) म्हणाले. 

आतापर्यंत हात जोडलेत, फेक व्हिडीओने महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अन्यथा... : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत (CM Uddhav Thackeray On Corona Virus) आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणाऱ्यांचे आभार मानले. “महाराष्ट्राच्या एकीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन करणार नाही, जाणीवपूर्वक चुकीचे व्हिडीओ पसरवू नका, त्यांच्यावर कारवाई करु,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी हात जोडतोय, धन्यवाद देतोय, मी माझ्या आवाहनामध्ये नेहमी विनंती (CM Uddhav Thackeray On Corona Virus) करतोय, कृपा करुन असे शब्द वापरतोय हे शब्द केवळ आपल्यासाठी आहेत. माझ्या तमाम बंधू, भगिनी आणि माता जे संयम आणि शिस्त पाळत आहेत धैर्य दाखवत जिद्दीने लढत आहेत त्यांच्यासाठी वापरतोय,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“पण हे शब्द तुम्हाला वापरल्यानंतर आणखी एक विषाणू आता समोर येतोय. जसं कोरोनाचा विषाणू आहे तसाच आणखी एक विषाणू आहे जो आपल्या समाजात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करतो. हा विषाणू समाजघातक आहे. त्याला मी सांगू इच्छितो. विनंती, कृपा करा असे शब्द माझ्या महाराष्ट्रातील माता, भगिनींसाठी आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मी कोणत्याही टोकाचं पाऊल उचलेल. या सर्व महाराष्ट्राला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. हा माझा महाराष्ट्र वाचणार. पण जो कुणी कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ बणून मग ते नोटांना थुंकी लाऊन पसरवणं, वेगवेगळे इशारे देणे, असं जर प्रयत्न केला तर कोरोना विषाणूपासून मी माझा महाराष्ट्र वाचवेल. पण तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यापासून वाचू देणार नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“मी संयमाची भाषा वापरत आहे, विनंती करतोय, हात जोडतोय,जात-धर्म कोणताही असो कोरोना वायरस एकच आहे. मात्र समाजात दुही निर्माण करण्याचा वायरस पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल,तर कोविडपासून मी वाचवेन पण अशा वृत्तींना वाचवणार नाही,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

घरात राहणं हा एकच उपाय

“मी सिंगारपूरच्या पंतप्रधानांचं भाषण बघितलं. येत्या मंगळवारपासून त्यांनी सिंगापूरमध्ये लॉकडाऊन घोषित केलं आहे. आपण ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी संपूर्ण जगाने केल्या आता त्याच गोष्टी सिंगापूरही करत आहे. याचा अर्थ काय तर देश, जातपात, धर्म कोणताही असो विषाणू एकच आहे. त्याचा दुष्परिणामही एकच आहे. त्याचा इलाज हा आता केवळ नाईलाज म्हणून घरात राहणं हा एकच आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“पुढील सूचनांपर्यंत महाराष्ट्रात कोणताही उत्सव, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा सोहळे होणार नाहीत. गुढीपाडवा, पंढरपूर वारी, रामनवमी घरी साजरे झाले, अन्य धर्मीयांनीही तसंच करावं,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अडकून पडलेल्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची

“अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांनी अन्यत्र कुठेही जाऊ नये, महाराष्ट्र सरकार सर्वांची खबरदारी घेत आहे,” असेही आश्वासन उद्धव ठाकरेंनी सर्वांनी दिली. 

उद्धव ठाकरेंकडून सोलापूरच्या सात वर्षाच्या मुलीचे कौतुक

“उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधताना सोलापूरच्या आराध्या नावाच्या चिमुकलीचे कौतुक केले. “आज संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात सर्वजण संयम दाखवत आहेत. त्यात या चिमुकलीतचं वेगळेपण म्हणजे आज तिचा वाढदिवस आहे. आराध्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तमाम महाराष्ट्राच्या वतीने तुला आशीर्वाद देतो. प्रत्येक जण काहीना काही मदत करत असताना हे वय हट्ट करण्याचं, लाड पुरवून घ्यायचं आहे. पण आराध्या आज तू वेगळा आदर्श जगामोर निर्माण केला आहे. आराध्याने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मदत दिली आहे. आराध्याने आगळंवेगळी ओळख ठेवली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची वृत्ती आणि हीच महाराष्ट्राची ओळख तू ठेवली आहे.”

“आता मला खात्री आहे ही समज सात वर्षाच्या मुलीमध्ये आली असेल तर आज आपण हे युद्ध जिंकलं असं समजा. हा संयम, जिद्द आणि शिस्त या पलिकडे कोणतेही शस्त्र आपल्याकडे नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या युद्धात सर्व एकत्र 

“या एका युद्धामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे की, सर्वजण जातपात, पक्ष सर्व एका बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. पंतप्रधान मोदी देखील चर्चा करत असतात, फोन करत असतात. आज सोनिया गांधी यांनीदेखील फोन केला. शरद पवारही सोबत आहेत. सर्व धर्माचे धर्मगुरुसुद्धा सोबत आहेत. काही मुल्ला-मौलवी माझ्या संपर्कात आहेत. अनेक संस्था, व्यक्ती, दिग्गज, कलाकार,खेळाडू आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“विलगीकरण कक्षासाठी आपल्या जागा मोकळ्या करुन देत आहेत. शाहरुख खान यांनी त्यांची जागा ऑफर केली आहे. अनेक हॉटेल्सने खास करुन ताज आणि ट्रायडेन्ट यांनी डॉक्टर्सच्या राहण्याची सोय केली आहे. यापूर्वीच त्यांनी आपली हॉटेल्स विलगीकरण कक्षासाठी दिली आहेत. काही जणांनी आपले हॉस्पिटल्स दिले आहेत. काही संस्था स्वत: होऊन जेवणाचं वाटप करत आहेत. काहीजण पैसे देत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत आहेत आणि स्वत:हून पुढे येत आहेत, प्रत्येकजण सिंहाचा, खारीचा वाटा उचलत आहेत,” असे सांगत उद्धव ठाकरेंनी सर्वांचे धन्यवाद मानले.

Published On - 2:24 pm, Sat, 4 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI