काँग्रेसच्या मनात नेमकं काय? महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत नाना पटोले यांचं महत्त्वाचं वक्तव्य
गोंदिया-भंडारा लोकसभा आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही जागेवर काँग्रेसचा उमेदवार असल्याचे संकेत नाना पटोले यांनी दिले. या दोन्ही जागेवर पंजा असणार असल्याचे त्यांनी सांगितलं. दोन्ही जागा आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

गोंदिया | 23 फेब्रुवारी 2024 : देशात पुढच्या दोन महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक फार महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएमध्येही राजकीय रणनीती आखली जात आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतही तेच सुरु आहे. आगामी काळात भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक ‘करो या मरो’च्या धर्तीवर काम करणार आहेत. त्यासाठी देशभरातील विरोधी पक्षातील नेते एकत्र होताना दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. जोरदार बैठकांचं सत्र सुरु आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. हा फॉर्म्युला नेमका काय ठरतो? याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाकडून लोकसभेच्या विविध जागांवर दावा केला जातोय. याचबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट 10 ते 12 लोकसभेच्या जागा लढण्यावर ठाम आहे. याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “शरद पवार काय म्हणाले हे मला माहीत नाही. पण येत्या 26, 27 फेब्रुवारीला जागा वाटपाबाबत बैठक आहे. त्या बैठकीत जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य राहील. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आणि त्यामुळे चर्चा करून हा प्रश्न सोडविला जाईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. गोंदिया-भंडारा लोकसभा आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही जागेवर काँग्रेसचा उमेदवार असल्याचे संकेत नाना पटोले यांनी दिले. या दोन्ही जागेवर पंजा असणार असल्याचे त्यांनी सांगितलं. दोन्ही जागा आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
झिशान सिद्दीकी यांच्या आरोपांवर नाना पटोले म्हणाले…
“उद्धव ठाकरे यांना खूश ठेवण्यासाठी मुंबईपासून ते दिल्ली पर्यंतचे नेते मला रागवण्यासाठी फोन करत होते”, असा आरोप काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस नेते वर्षा गायकवाड आणि पक्ष नेतृत्वार केले आहेत. याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार बोलणं टाळलं. “याबद्दल मला तेवढं काही माहिती नाही. पक्ष आणि संघटन या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याने याविषयी मला जास्त काही माहीत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘सरकार शेतकरी विरोधी’
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदी करण्यात आली. मात्र अद्यापही राईस मिलने हा धान मिलिंग करिता उचलला नसल्यामुळे धान खराब होण्याच्या स्थितीमध्ये येण्याची चिन्ह आहेत. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजप प्रणित सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याने बोनसचे पैसे, धान विक्रीचे पैसे अद्यापही दिलेले नाही आणि हेतू पुरस्कर जोपर्यंत राईस मिल धान उचलत नाही तोपर्यंत धानाचे पैसे देणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. हे सरकार मुळातच हा धान खराब व्हायला पाहिजे आणि दारू व्यवसायिकांच्या घशात टाकण्याचा त्यांचा हेतू आहे”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
