नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी लस टोचावी त्यानंतर मी लस टोचून घेईन: प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लसीकरणाबाबत सवाल उपस्थित केलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:32 PM, 16 Jan 2021
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी लस टोचावी त्यानंतर मी लस टोचून घेईन: प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरण मोहिमेचं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. दरम्यान, या लसीकरण मोहीमेवर अनेक राजकीय व्यक्तींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लसीकरणाबाबत सवाल उपस्थित केलाय.(Question mark by Prakash Ambedkar on vaccination campaign)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचल्यानंतरच मी लस टोचून घेईन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. दरम्यान, कोरोना लसीकरणाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका आणि प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच आपण 3 कोटी आरोग्य सेवकांना लस देणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात आलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि फ्रन्ट लाईन कामगारांना लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोठी आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावं लागेल. आपले शास्त्रज्ञांनी भारतीय बनावटीच्या दोन्ही लसीबाबत खात्री पटल्यानंतरच लसीच्या आपत्कालीन वापसाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितलं.

औरंगाबादच्या नामांतरावर आंबेडकर काय म्हणाले?

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना संभाजीनगरच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. तर काँग्रेसनं संभाजीनगरच्या नावाला विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा या मागणीला अँटी मुस्लिम भुमिकेचा वास येत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. शहराचं नाव बदलायचं असेल तर लोकांचं मत जाणून घ्या, त्यासाठी मतदान घ्या, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

‘पाण्याच्या मुद्द्यांवरुन निवडणूक लढणार’

औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. पाण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला टार्गेट करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनीही पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या औरंगाबादकरांना 9 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ते आम्ही 2 दिवसांवर आणू, असं आश्वासन आंबेडकरांनी दिलंय.

संबंधित बातम्या :

Corona Vaccination : अदर पुनावालांनी टोचली लस, पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासार्हतेच्या मुद्द्याला पाठबळ

राज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण

Question mark by Prakash Ambedkar on vaccination campaign