शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी अन्…; गळ्यात कापसाची माळ विरोधक थेट विधानभवनात, मागण्या काय?
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन करण्यात आले. कापसाची माळ घालून वडेट्टीवार यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

सध्या नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार आंदोलन करत सत्ताधारी सरकारला धारेवर धरले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यात कापसाच्या बोंडांची माळ घालून विधानभवनात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला.
विधानभवनात काय घडलं?
महाविकासआघाडीच्या आमदारांनी एकत्रितपणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनादरम्यान आमदारांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते. ज्यावर फसवणीस सरकार असे स्पष्टपणे लिहिले होते. याशिवाय विरोधकांकडून विविध घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला. शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी!, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे!, कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती! अशा अनेक घोषणा यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात विजय वडेट्टीवार यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि महाविकासआघाडीचे अन्य प्रमुख नेते व आमदार सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मांडली. विदर्भात अधिवेशन आहे. कापूस, सोयाबीन यांसह इतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. या भूमिकेतून किमान सरकारने आता तरी जागं व्हावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सध्याच्या बाजारभावावर आणि शासकीय धोरणांवर सडकून टीका केली.
सध्या कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात
शेतकऱ्याला हमीभाव मिळालेला नाही. सध्या कापसाला फक्त ७ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. सोयाबीनलाही भाव नाही. कुठला हमीभाव आहे? कुठे कापसाला दर आहे? सध्या कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. कापूस शेतकऱ्याला केवळ १५ क्विंटल हेक्टरी मदतीची घोषणा केली जात आहे. या परिस्थितीत जर शेतकऱ्याला १० ते १५ क्विंटल कापूस येत असेल तर तो विकणार कुठे? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारची शेतकऱ्यांप्रती अजिबात आस्था नाही. राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधी पक्षाने सरकारकडे तातडीने पुढील मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झाला असून त्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. कापूस, सोयाबीन, धान आणि तूर या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळाला पाहिजे. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या नुकसानीची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करून खरेदीला गती द्यावी. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत महाविकास आघाडी आपला लढा सुरू ठेवेल, असा इशारा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
