पैसे नसतील तर बायको उपभोगायला द्या, जात पंचायतीचं संतापजनक फर्मान

पैसे नसतील तर बायको उपभोगायला द्या, जात पंचायतीचं संतापजनक फर्मान

लातूर : भावाचा संसार व्यवस्थित सुरु ठेवायचा असेल तर जात पंचायत बसवावी लागेल आणि त्यासाठी 50 हजार रुपये द्यावे लागतील, असं फर्मान सुनावणाऱ्या पंचांनी मूर्खपणाचा कळस गाठलाय. पैसे नसतील तर बायको उपभोगायला द्या, असं संताप आणणारं फर्मानही भिल्ल वस्तीतल्या पंचांनी एका दाम्पत्याला  सुनावलं. पंचांच्या या अघोरी कृत्यामुळे आता या दाम्पत्याने आपल्या दोन मुलांसह गाव सोडलंय. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथील भिल्ल वस्तीत हा प्रकार घडला.

निलंगा इथे साधरणतः 300 लोकांची भिल्ल समाजाची वस्ती आहे. या वस्तीवर जात पंचायतीचा पगडा आहे. या वस्तीत राहणारे गोविंद गाणंगुळे आणि त्यांच्या पत्नी अंबिका गाणंगुळे यांच्यावर ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती ओढावली आहे. गोविंद यांच्या भावाला पंच लक्ष्मण विभुते यांची मुलगी दिली होती, पुढे त्यांना पाच मुलेही झाली, मात्र गोविंदचा भाऊ सुरेश दारूच्या व्यसनी गेल्याने पंचायतीने काडीमोड घेतला.

सासरे जातीतले पंच आहेत आणि जावई त्यांना शोभेल असं वर्तन करत नसल्याचा ठपका सुरेशवर ठेवण्यात आला. या काडीमोडीसाठी 20 हजार रुपयांचा दंडही गोविंद यांच्याकडून वसूल करण्यात आला होता. पंचांनी आता पुन्हा गोविंदचा  भाऊ सुरेश याचा संसार सुरळीत करून द्यायचा असेल तर 50 हजार रुपये लवकर जमा करा असं फर्मान काढलं आहे. हे 50 हजार रुपये जमा करण्यास नकार दिल्याने गोविंद यांच्या पत्नीला नग्न करण्याचा प्रयत्न पंचाच्या मुलाने केला.

याशिवाय पंच लक्ष्मण विभुते आणि दशरथ विभुते यांनी पैसे नसतील तर गोविंद यांच्या पत्नी अंबिका यांना उपभोगायला पंचाकडे पाठव असं फर्मान काढलंय. या घटनेने घाबरलेल्या या दाम्पत्याने आता घर आणि गाव सोडलं आहे.

जात पंचायतीवर कारवाई करावी आणि संरक्षण द्यावे या मागणीसाठी पीडित  दाम्पत्याने आज लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. आता जिल्हा प्रशासन जात पंचायतीच्या या अघोरी प्रकाराला नियंत्रण कसे घालते हे पाहावे लागेल. या घटनेने जात पंचायत कशी माणुसकीला काळीमा फासणारी ठरतेय हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *