कोर्टाचा मनोज जरांगेंना दणका, आंदोलनाला जागाच नाकारली, आता उपोषण कुठं होणार?
मुंबईतील वर्दळ, गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता न्यायालयाने आपला हा निर्णय जाहीर केला आहे. तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी मुंबईत जाणारच आहे, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली असून आता जरांगे यांचे आंदोलन होणार की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर जरांगे आंदोलन कुठे करू शकतात, याबाबातही न्यायालयाने सविस्तर सांगितले आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झगडणारे मनोज जरांगे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात येऊन आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मुंबईतील वर्दळ, गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता न्यायालयाने आपला हा निर्णय जाहीर केला आहे. तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी मुंबईत जाणारच आहे, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली असून आता जरांगे यांचे आंदोलन होणार की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर जरांगे आंदोलन कुठे करू शकतात, याबाबातही न्यायालयाने सविस्तर सांगितले आहे.
न्यायालयाचा निर्णय काय?
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही न्यायालयात याचिका दाखल करत जरांगे यांना आंदोलनास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. या मागणीवर सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाची स्पष्ट भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने एका प्रकारे मनोज जरांगे यांना खडसावले आहे. सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे.
पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येत नाहीत
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. तसेच सुनावणीत गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीचा हवाला यावेळी न्यायालयाने दिला.
जरांगे यांच्यापुढे काय पर्याय, कुठे आंदोलन करता येणार?
न्यायालयाने मनोज जरांगे यांना थेट मुंबईत येऊन आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मात्र जरांगे यांचा आंदोलनाचा अधिकारही न्यायालयाने मान्य केला आहे. न्यायालयाने सरकार जरांगे यांना आंदोलनासाठी ठाणे, नवी मुंबई यासारख्या भागात पर्यायी जागा देऊ शकतं, असे मत व्यक्त केले आहे. मुंबईतील जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये म्हणून शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी जरांगे यांना नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा द्यायची की नाही यावर सरकार निर्णय घेऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार? तसेच जरांगे यांना त्यांच्या आंदोलनासाठी कुठे जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
