Sunetra Pawar : सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, रोहित पवारही राजधानीत; घडामोडींना वेग !

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेतली, तसेच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सादर करण्याची शक्यता आहे. याचवेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या 'अपघाता'बाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडींमुळे दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकारणाला वेग आला आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, रोहित पवारही राजधानीत; घडामोडींना वेग !
राजधानीत घडामोडींना वेग
| Updated on: Feb 11, 2026 | 10:10 AM

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्या मंत्रीमंडळाच्या बैठकीसही उपस्थित होत्या. काल रात्री सुनेत्रा पवार या राजधानी दिल्लीत दाखल झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हेही आज राजधानीतच आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग आला असून संपूर्ण राज्याचं लक्ष दिल्लीकडे लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. तर रोहित पवार हे आज दिल्लीत 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. काल मुंबईत माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आज त्यांची दिल्लीत पत्रकार परिषद असणार आहे. अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100 टक्के घात , असा आरोप त्यांनी काल केला होता. तर आज दिल्लीत ते काय बोलतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा

उपमुख्मंत्री सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार काल रात्री दिल्लीत पोहोचल्या, आज रात्री त्या पुन्हा मुंबईला येणार आहेत. मात्र तत्पूर्वी आज दिवसभरात अनेकांच्या भेटीगाठी होणार असून महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. थोड्याच वेळात त्या नवीन महाराष्ट्र सदनातून निघणार असून प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी 11 वाजता संसदेच्या कार्यालयात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेणार आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत.

आजची सर्वात महत्वाची भेट म्हणजे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांची भेट ठरेल. सुनेत्रा पवार त्यांची भेट घेणार आहेत. आज त्या त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा त्या उपराष्ट्रपतींकडे सादर करू शकतात, अशीही माहिती समोर येत आहे. तसेच त्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेऊ शकतात. आजच्या भेटींमध्ये काय, कशी चर्चा होते, हे पाहणं महत्वाचं ठरेल. अजित पवार यांचे 15 दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झालं, त्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत आल्या आहेत.

गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्यात पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्यासोबत त्यांची काही चर्चा होते का हे पाहणंही महत्वाचं ठरेल.

रोहित पवारांची राजधानीत पत्रकार परिषद

मुंबईत काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे आज राजधानी दिल्लीतही पत्रकार परिषद घेणार आहेत. काल मुंबईत त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांची पुढची मालिका आज रोहित पवार यांच्याकडून दिल्लीत वाचली जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरू शकतो.