
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी जालन्यात त्यांची पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट देखील केला, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपावर टीका करताना ही भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे, ते दाखवण्यासाठी माझा हा दौरा आहे, कोकणात मी बैठक घेणार आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शेतकऱ्यांच्या पिकाला हमिभाव मिळाला पाहिजे, आत्ताच ती वेळ आहे सातबारा कोरा करायची, संपूर्ण जमीन खरडून गेली आहे. यावर्षी पाऊस आधी सुरू झाला, मी अनेक शेतकऱ्यांना भेटलो, ज्या शेतकऱ्यांचं वय 90 पेक्षा जास्त आहे, त्यांनाही भेटलो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मराठवाडा आवर्षग्रस्त भाग आहे, मात्र यंदा अति पाऊस झाला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, लोकांचं आयुष्य पाण्यात वाहून गेलं. सरकार आल्यानंतर सातबारा कोरा करणार असं म्हटले होते पण तसं झालं नाही, आता सातबारा कोरा करण्याची योग्य वेळ आहे. केंद्रीय पथक कधी आलं अन् गेलं कधी हेच कळलं नाही, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री आहेत, नाहीतर ते दाढी वाल्यालाच (एकनाथ शिंदे) यांना मुख्यमंत्री करणार होते. असा गौप्यस्फोट यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
पार्थ पवार प्रकरणावर प्रतिक्रिया
पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे, यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मुरलीधर मोहोळ यांचा भ्रष्टाचार दाबला गेला. अंबादास दानवे यांनी अनेक भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत. भाजप भ्रष्टाचार करणाऱ्यांना अभय देत आहे, जे काही होणार आहे ते जगजाहीर होणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.