राष्ट्रवादीला अर्थखातं परत देणार का? फडणवीस यांनी सोक्षमोक्ष लावला; दोन वाक्यात म्हणाले, जेव्हा…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आम्हाला अर्थखातं दिलं जात नसल्याची खंत व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात बरंच काही बदललं आहे. राष्ट्रवादी पक्षाची सर्व सूत्रं अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेली आहेत. दुसरीकडे अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचीही जबाबदारी आलेली आहे. सध्या पक्ष वाढवण्यासोबतच स्वत:चे नेतृत्त्व सिद्ध करण्याचीही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे राज्याच्या अर्थखात्याचीही जबाबदारी होती. परंतु अजितदादांकडे असलेले उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा पवार यांना मिळालेले असले तरीही त्यांच्याकडे अद्याप अर्थखाते देण्यात आलेले नाही. याबात सुनेत्रा पवार यांन नुकते नाराज व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, महत्त्वाचे मंत्री, शासकीय अधिकारी यांचे शिष्टमंडळ आज दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. या भेटीत कांद्याच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हीच बैठक संपल्यानंतर फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी बोलताना पत्रकारांनी त्यांना सुनेत्रा पवार यांनी अर्थ खात्याबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर विचारण्यात आलं. यावर बोलताना अद्याप तरी माझ्यापर्यंत त्यांची अशी कोणतीही नाराजी आलेली नाही. त्या याबाबत जेव्हा माझ्याशी काही बोलतील, तेव्हाच मी यावर माझे मत व्यक्त करेन, असे फडणवीस यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांनी काय नाराजी व्यक्त केली?
राष्ट्रवादीच्या नेत्यांची 26 मे रोजी मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. याच बैठकीत अर्थखात्यावरही चर्चा झाल्याचं बोललं जातंय. अजितदादा असताना अर्थखातं राष्ट्रवादीकड होते. आता हे खाते परत राष्ट्रवादीला मिळालेले नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंर आता या कथित नाराजीनंतर राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. फडणवीस यांनीही अद्याप कोणतीही नाराजी माझ्याकडे आलेली नाही, असे सांगितल्याने भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.