Manikrao Kokate : कोकाटेंच्या ‘भिकारी सरकार’ विधानावर फडणवीसांची नाराजी, म्हणाले, एखाद्या मंत्र्याने…
माणिकराव कोकाटे यांनी पीकविम्याबद्दल बोलताना शेतकरी नव्हे तर सरकार भिकारी आहे, असे विधान केले. त्यावर आता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळातील रमी खेळत असल्याच्या व्हिडीओमुळे चांगलेच वादात सापडले आहेत.कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे मी रमी हा ऑनलाईन जुगाराचा खेळ खेळत नव्हतो तर जाहिरात स्कीप करत होतो, असा दावा कोकाटे यांनी केला होता. त्यानंतर आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केला आहे का? असा सवालही त्यांनी संतापून केलाय. असे असतानाच आता कोकाटे यांनी सरकार भिकारी आहे, अशा आशयाचं विधान केलंय. आता विशेष म्हणजे कोकाटे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
एखाद्या मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं
फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी कोकाटे यांच्या या विधानाविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना कोकाटे नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. तथापि त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर एखाद्या मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच पीकविम्याची पद्धती पदलण्याचा आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतलाय. कारण आपल्या लक्षात आलं की शेतकऱ्यांना काही वर्षे फायदा झाला. पण बहुसंख्य वर्षांमध्ये पीकविम्याचा फायदा कंपन्या घेत आहेत. पीकविम्याची ही पद्धत बदलत असताना आपण शेतकऱ्यांना मदत तर करूच तसेच 5000 कोटी रुपये आपण दरवर्षी शेतीमध्ये गुंतवू असाही निर्णय घेण्यात आला. त्याची यावर्षीपासून अंमलबजावणी चालू झाली आहे, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.
त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही. देशातील कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या राज्याची अर्थव्यवस्था अतिशय उत्तम आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले होते?
माणिकराव कोकाटे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. विधिमंडळात रमी खेळत असल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरच त्यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. तसेच शेतकरी आणि पीकविम्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं. आम्ही शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच-साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तत्काळ रद्द केले. माझे आतापर्यंत 52 अर्ज निघालेले आहेत, असं विधान कोकाटे यांनी केलं. त्यांच्या याच विधानावर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
