होय, देवेंद्र फडणवीस हिंदूपण अन् मराठीपण..; फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना थेट उत्तर
भाजप म्हणतंय की मुंबईचा महापौर हिंदू होईल, तर मग त्यांना मराठी माणूस हिंदू वाटत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला होता. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्यातच मुंबई महानगर पालिकेचा महापौर कोण होणार यावरून सध्या राजकारण सुरू आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून मराठी माणूस महापौर होईल, असं वक्तव्य करण्यात आलं. तर दुसरीकडे महायुतीने हिंदू महापौर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मुंबईचा महापौर मराठी होणार की हिंदू होणार यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. नुकत्याच दिलेल्या संयुक्त मुलाखतीत ठाकरे बंधूंनी भाजपच्या हिंदू महापौर या दाव्याचा समाचार घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट उत्तर दिलं आहे.
टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडीटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, “मी का म्हणालो? त्यांच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, आम्ही मराठी महापौर करणार. त्याचा अर्थ केवळ मराठी नाही. महाराष्ट्रातली मराठी नाही. ज्याचं मराठीवर प्रेम आहे. मराठी मुस्लिम आहेत. मराठीवर प्रेम करणारे आहेत. दुसरं एमआयएमने बुरखेवाली महापौर म्हटलंय. म्हणून मी बोललो. हे उघडपणे म्हणतात मराठी आणि मुस्लिम आम्हाला निवडून देतील. याचा अर्थ हिंदूंपेक्षा मराठी वेगळे आहेत. त्यांनी उघडपणे भूमिका मांडली. हा मराठी माणूस कट्टर हिंदुत्ववादी आहे का? फडणवीस हिंदूपण आहे. फडणवीस मराठीपण आहेत.”
मुंबईचा महापौर हिंदू होईल, असा दावा भाजपकडून वारंवार केला जात आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या संयुक्त मुलाखतीत म्हटलं होतं, “आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की मुंबईचा महापौर मराठीच होईल. पण भाजप त्याला हिंदू रंग देऊन मराठी माणसांमध्ये फूट पाडत आहे. जर भाजप म्हणतंय की महापौर हिंदू होईल, तर मग त्यांना मराठी माणूस हिंदू वाटत नाही का? हा मराठी अस्मितेचा अपमान आहे.”
यावर राज ठाकरेंनीही भाजपवर टीका केली. “भाजपला नेमका कोणता हिंदू अपेक्षित आहे? जो मराठी बोलतो तो हिंदू नाही का? देवेंद्र फडणवीसांनी एकदा स्पष्टच करावं की त्यांच्या व्याख्येनुसार मराठी माणूस हिंदू आहे की नाही”, असा सवाल त्यांनी केला होता.
