मतदान वाढवल्याचा ठाकरेंकडून आरोप, फडणवीसांचं सडेतोड उत्तर, वातावरण तापलं
विधानसभेत 40 ते 42 लाख मतदार वाढवले गेले आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला आहे, या आरोपाला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

विरोधकांकडून सध्या मतदान चोरी आणि ईव्हीएमवरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. यावरून राज्यात आता चांगलंच वातावरण तापलं आहे. विधानसभेत 40 ते 42 लाख मतदार वाढवले गेले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. वाढवले गेलेले मतदार कोण ते तपासा, त्यांना मतदान करू देऊ नका, असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. आजपासूनच मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘असं म्हटलं आहे, दिल बहलाने केलीये खयाल अच्छा है गालीब, मी यावर एवढंच म्हणेल.’ असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, जोपर्यंत सत्य स्विकारणार नाही तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. पहिल्यांदा यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकले 2014 ला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं राज्य होतं. देशातही काँग्रेसचं राज्य होतं. पंधरा- पंधरा वर्ष काँग्रेसंच राज्य होतं. त्यामुळे आपण का हारतो आहोत? किंवा लोकांनी आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास न करता जोपर्यंत ते छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत ते सत्तेत येऊ शकत नाहीत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही ते बघा, निवडणुकीच्या दिवशी जे मतदार नाहीयते त्यांच्या नावानं बोगस मतदान होतं. काही ठिकाणी दोबार तिबार मतदान होतं. त्यामुळे आता डोळ्यात तेल घालून घरोघरी जाऊन मतदार यादी चेक करा. आणि गेल्या निवडणुकीत जी मतदान चोरी झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 42 -42 लाख मतदान आपल्या महाराष्ट्रात वाढवलं गेलं, हे वाढलेलं मतदार कोण आहेत? ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
