धारावी पुनर्विकासाने जीवनमान उंचावणार, बालकांचे कुपोषण दूर होणार
धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथे स्वच्छता येईल, नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल आणि त्यामुळे बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण निश्चितच कमी होईल अशी आशा डॉ. सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यभर कुपोषणाचे प्रमाण कमी होत असताना देखील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत मात्र पाच वर्षांखालील अनेक बालकांना अजूनही दूषित पाणी, अपुरे पोषण आणि अस्वच्छतेमुळे गंभीर कुपोषणाचा सामना करावा लागत आहे.मे २०२५ मध्ये आलेल्या एका अहवालानुसार, मुंबई उपनगरांतील ० ते ६ वयोगटातील २.८५ लाख बालकांची उंची आणि वजन तपासण्यात आले. यामध्ये २९% ( ८२,८०९ ) बालके कमी उंचीची (किंवा कमी/मध्यम प्रमाणात) आढळली, तर ११% ( ३१,४१० ) बालकांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी होते. यामध्ये गेल्या महिन्यांच्या तुलनेत थोडी सुधारणा दिसून आली आहे.
‘धारावीतील दहा पैकी सात मुले कुपोषित आहेत आणि त्यामागचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता आणि कुपोषण होय. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत इंटीग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हीसेस सारख्या योजना राबवूनही ही परिस्थिती अजूनही गंभीर आहे, असे धारावीत प्रॅक्टीस करणारे डॉक्टर रुपेश सोनवणे सांगतात. ते पुढे म्हणाले की “माझ्या दवाखान्यात येणाऱ्या सुमारे ७० टक्के मुलांचे वजन त्यांच्या वयानुसार कमी आहे. त्यांचे वजन केवळ १६ ते १८ किलो असते. दूषित पाणी, अस्वच्छता, अपुरा आहार आणि रस्त्यावरील दूषित खाद्यपदार्थ हे यामागची मुख्य कारणं आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
मुले सतत आजारी पडतात
या मुलांमध्ये सामान्यतः निस्तेज त्वचा, त्वचारोग, आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कमजोर प्रतिकारशक्ती असे आजार दिसतात. “त्यामुळे त्यांना सतत सर्दी, खोकला, ताप अशा सर्वसाधारण आजारांचा सामना करावा लागतो. धारावीत केवळ कुपोषण नाही तर क्षयरोगाचे प्रमाण देखील खूप जास्त आहे असे रुपेश सोनवणे यांनी सांगितले.
मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम
‘घरासमोरून वाहणाऱ्या गटारांचे पाणी, अस्वच्छता आणि वारंवार दूषित होणारे पिण्याचे पाणी यामुळे धारावीमधील मुले आजारी पडत आहेत. तर उघड्यावर बनवले जाणारे तसेच रस्त्याच्याकडेला विकले जाणारे खाद्यपदार्थ इथल्या मुलांना कोणता पोषक तत्व देणार आहेत? घरातील अपुरी जागा, मोकळ्या मैदानांचा अभाव आणि घरातील गरीब आर्थिक परिस्थिती यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत मुले वारंवार आजारी पडणे आणि त्यांच्या वाढीवर त्याचा परिणाम होणे, हे धारावीतील रहिवाशांसाठी नवीन नाही,’ असे काळा किल्ला, धारावी येथील रहिवासी कुसुम खाडे यांनी सांगितले.
बालकांमध्ये कुपोषणाचे लक्षणीय प्रमाण
गेल्यावर्षी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील क्युअरियस वैद्यकीय संशोधनपत्रिकेत (क्युरीअस मेडिकल जर्नल) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालात धारावीतील ५ वर्षाखालील मुलांवरील कुपोषणाचा सखोल अभ्यास मांडण्यात आला होता. या अभ्यासात धारावीतील झोपडपट्टीतील बालकांमध्ये कुपोषणाचे लक्षणीय प्रमाण दिसून आले. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी कार्यरत पोषण योजनांमध्ये अधिक दृढता आणि अंमलबजावणीसाठी भारतीय आरोग्य धोरणकर्त्यांनी अधिक प्रयत्न करायला हवेत, असे ही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
झोपडीत राहणारी मुले सतत आजारी पडतात, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत असल्याने त्यांच्या आहारात अनेक पोषण मूल्यांची कमतरता असते. त्यामुळे त्यांना कुपोषणाचा धोका अधिक असतो असे या अहवालात म्हटले आहे.
वाढ खुंटणे हे दीर्घकालीन कुपोषणाचे निदर्शक
अभ्यासात नमूद करण्यात आले की, अभ्यासात सहभागी झालेल्या मुलांपैकी ४४ टक्के मुले कमी वजनाची होती, १६.३ टक्के मुले स्थूल (ओबेज ) तर ४.६५ टक्के मुले अधिक वजनाची (ओव्हरवेट ) होती. ० ते ५९ महिन्यांच्या वयोगटात ६२.५ टक्के मुलांमध्ये ठेंगणेपणा (स्टंटिंग) तर २६.६ टक्के मुलांमध्ये वजन घट (वेस्टिंग) आढळून आले. वाढ खुंटणे हे दीर्घकालीन कुपोषणाचे निदर्शक आहे तर वजन कमी असणे म्हणजे अलीकडच्या काळात अन्नटंचाई किंवा आजारपणामुळे निर्माण झालेली स्थिती,” असे या अहवालात स्पष्ट केले आले आहे.
मातांचा गैरसमज
दुर्दैवाने या अहवालात असेही नमूद करण्यात आले की, मध्यम ते गंभीर कुपोषणग्रस्त मुलांच्या माताच असा समज करतात की त्यांची मुले पूर्णपणे निरोगी आहेत. “कुपोषणाविषयी अशी चुकीची समजूत असल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि मुले अधिक आजारी पडतात,” असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून औषधे घेतात
धारावीच्या सुप्रसिद्ध ९० फूट रस्त्यावर असलेल्या साई हॉस्पिटलचे संचालक डॉ. खालिद शेख हे देखील या अहवालाशी सहमत आहेत. यापुढे ते म्हणतात “मी गेली अनेक दशके धारावीत वैद्यकीय सेवा देतोय आणि इथल्या मुलांमध्ये कुपोषणाचे जास्त प्रमाण मी स्वतः अनुभवले आहे,”.डॉ. शेख यांच्या मते, धारावीत एक अत्यंत चिंताजनक बाब म्हणजे कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता मेडिकल दुकानातून स्वत:च्या मनाने औषधं घेण्याची प्रथा. त्यामुळे अनेक रुग्ण चुकीच्या औषधांमुळे गंभीर आजारी पडून रुग्णालयात दाखल होतात.
