जे काम महायुतीच्या 3 मंत्र्यांना जमलं नाही ते एका नोटिशीनं केलं? नाशिक विधान परिषदेतून गोकुळ गीतेंच्या माघारीची इनसाईड स्टोरी

नाशिक विधान परिषद निवडणुकीतून अखेर गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. आज त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. गोकुळ गीते यांनी पाठिंबा दिल्यामुळे नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जे काम महायुतीच्या 3 मंत्र्यांना जमलं नाही ते एका नोटिशीनं केलं? नाशिक विधान परिषदेतून गोकुळ गीतेंच्या माघारीची इनसाईड स्टोरी
नाशिकमधील महायुतीचं बंड थंड
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 4:00 PM

नाशिक विधान परिषद निवडणुकीमधील महायुतीचा तिढा अखेर सुटला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे महायुतीचे नाशिक मधील अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक विधान परिषदेसाठी गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांनी आधीच भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर दुसरीकडे गोकुळ गीते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान त्यानंतर नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आली. शिवसेना शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं नाशिकमध्ये महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता.

दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु गोकुळ गीते यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतला ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या बंडखोरीचा मोठा फटका हा नरेंद्र दराडे यांना बसणार होता, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेऊन दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा यासाठी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. मात्र त्यामध्ये यश मिळत नव्हतं.

मात्र अखेर आज गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेत, नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला आहे. गणेश गीते यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांनी याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला मंत्री दादा भुसे  आणि उदय सामंत हे देखील उपस्थित होते.

दरम्यान  गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांना नाशिक म्हाडा प्रकरणात उच्च न्यायालयाने अटपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यानंतर या संदर्भात  राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकीलांना एक पत्र पाठवलं आहे, ज्यामध्ये त्यांनी गणेश गीते यांना उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना  केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या सर्व घडामोंडीमुळे आता उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. गोकुळ गीते यांनी महायुतीमधील नेत्यांच्या मनधरणीमुळे माघार घेतली की? दबावाचं राजकारण झालं? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान या संदर्भात आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे, त्यांच्यावर कोणतंही दबावतंत्र नाही. गीतेंबाबत भविष्यात विचार केला जाईल. म्हाडाचा विषय हा छोटा आणि न्यायप्रविष्ट विषय आहे. आता गीतेंना दरांडेबाबत कोणतीही तक्रार नाही असं महाजन यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us