योगेश कदमांच्या राजीनाम्याची चर्चा, एकनाथ शिंदेंचा एक घाव दोन तुकडे, केलं मोठं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्यानं योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे.

योगेश कदमांच्या राजीनाम्याची चर्चा, एकनाथ शिंदेंचा एक घाव दोन तुकडे, केलं मोठं वक्तव्य
Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2025 | 5:32 PM

शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिळे आणि खराब अन्नपदार्थ दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती,  हे प्रकरण चांगलंच तापलं होतं, त्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा एक व्हिडीओ समोर आला, त्या बॅगेमध्ये पैसे असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

हे सर्व सुरू असतानाच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलीसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली.

दुसरीकडे राज्यमंत्रिमंडळात फेरबदल होणार असून, वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याच्या बातम्या देखील सातत्यानं समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर चर्चेला आणखी उधाण आलं, दरम्यान या यादीमध्ये योगेश कदम यांचं नाव देखील असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे?  

योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे,  टीका करून काम बंद करता येत नाही, राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं, दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार?  योगेश कदम चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, यामध्ये योगेश कदम यांचा देखील राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी देखील चर्चा आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं वातावरण अधिकच तापलं आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आधीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.