Maharashtra Assembly Election : महायुती आणि मविआला ‘हे’ वाद मिटवणं जास्त आवश्यक, अन्यथा…
मविआ आणि महायुतीत काही जांगावरुन वाद निर्माण झालाय. मावळमध्ये अजितदादांचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप केले आहेत. तर सांगोल्याच्या जागेवरुन मविआत वादाची ठिणगी पडलीय.
मविआत जागावाटपावरुन सुरु असलेला वाद आता विकोपाला गेलाय. सांगोल्याच्या जागेवरुन देखील मविआत मोठा वाद निर्माण झालाय. मविआत सांगोल्याची जागा शेकापला सोडण्यात येणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. मात्र, सांगोल्याची शिवसेनेची होती आणि राहणार असं म्हणत संजय राऊतांनीही दावा ठोकला आहे. त्यामुळे सांगोल्याच्या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. सांगोल्याची जागा मविआचा घटकपक्ष असलेल्या शेकापला सोडण्यात येणार असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सांगोल्याच्या जागेवर ठाकरे गटाकडूनही दावा करण्यात आला आहे. सांगोल्याची जागा मविआने न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचं बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलं आहे. सांगोल्यात सध्या शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शहाजी बापू पाटील महायुतीकडून या मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर तिकडे दीपक साळुंखेंनी अजित पवारांची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
सांगोल्यातून दीपक साळुंखे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. तसेच उद्धव ठाकरेंकडून देखील उमेदवारीचे संकेत देण्यात आले आहेत. दीपक साळुंखेंच्या हातात मशाल, कोणाला चटके द्यायचे तुम्ही ठरवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सांगोल्याच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केल्यानंतर बाबासाहेब देशमुख यांनी देखील अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. मविआने जागा न सोडल्यास वेगळा निर्णय घेणार असल्याचं बाबासाहेब देशमुखांनी म्हटलं आहे.
सांगोल्याचा गेल्या निवडणुकीचा निकाल काय?
2019 मध्ये सांगोल्यातून शहाजी पाटील केवळ 768 मतांनी विजयी झाले होते. सांगोल्यात शिवसेनेच्या शहाजी पाटलांविरोधात शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख हे मैदानात होते. शहाजी पाटलांना 99 हजार 464 मतं मिळाली होती. तर अनिकेत देशमुखांना 98 हजार 696 मतं मिळाली होती. केवळ 768 मतांनी शहाजीबापू पाटलांचा विजय झाला होता.
महायुतीत मावळमध्ये वाद
एकीकडे सांगोल्याच्या जागेवरुन मविआत वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे महायुतीत मावळचे आमदार सुनील शेळकेंनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. शरद पवारांच्या छायेत काही भाजप पदाधिकारी काम करत असल्याचा शेळकेंचा आरोप आहे. मावळमध्ये सुनील शेळकेंना विरोध आहे. शुक्रवारी सुनील शेळकेंनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. मावळमधील राजकीय परिस्थितीवर शेळकेंनी फडणवीसांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी बाळा भेगडेंनी सुनील शेळकेंना विरोध करत मावळची जागा भाजपला सोडण्याची मागणी केली होती. मावळची जागा भाजपला न सोडल्यास बाळा भेगडेंनी बंडखोरीचे देखील संकेत दिले होते. तर दुसरीकडे सुनील शेळकेंना त्यांच्याच पक्षातील बापू भेगडेंचाही विरोध आहे. बापू भेगडे मावळमधून लढण्यावर ठाम आहेत.
2019मध्ये मावळ विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंविरोधात भाजपचे बाळा भेगडे मैदानात होते. या निवडणुकीत 1 लाख 67 हजार 712 मतं मिळाली तर बाळा भेगडेंना 73 हजार 770 मतं मिळाली होती. सुनील शेळकेंनी जवळपास 93 हजार 942 मतांनी बाळा भेगडेंचा पराभव केला होता. जागावाटपावरुन मविआ आणि महायुतीमध्ये काही जागांवर वाद निर्माण झालाय. त्यामुळे मविआने सांगोल्यात आणि महायुतीने मावळचा वाद न सोडवल्यास दोन्ही आघाड्यांना विधानसभेत फटका बसण्याची शक्यता आहे.